जावली तालुक्यातील प्रचार दौर्यात आ. शिवेंद्रराजे भोसले यांचे ठिकठिकाणी महिला भगिनींकडून स्वागत होत आहे.Pudhari Photo
Published on
:
16 Nov 2024, 2:13 am
Updated on
:
16 Nov 2024, 2:13 am
मेढा : विकासकामे कोण करतंय हे जावलीकरांना चांगलंच माहिती आहे. त्यामुळे विरोधी उमेदवाराच्या बिनबुडाच्या फेकाफेकीला माझ्यावर प्रेम करणारी जावलीतील जनता कदापि भीक घालणार नाही. माझे आणि जावलीकरांचे अतूट नाते असून सर्वांनी मतदानरूपी आशीर्वाद देऊन माझ्या पाठीशी ठामपणे उभे रहावे, असे आवाहन सातारा-जावली मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.
जावली तालुक्यातील म्हसवे गटात झालेल्या प्रचार दौर्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, माजी सभापती अरुणा शिर्के, माजी उपसभापती सौरभ शिंदे, एकनाथ ओंबळे, संदीप परामणे उपस्थित होते.
आ. शिवेंद्रराजे म्हणाले, आजवर तुम्ही सांगितलेली सर्व कामे मार्गी लावली आहेत. यापुढेही तुमच्या सूचनेनुसारच तुमच्या गावातील प्रश्न, समस्या सोडवल्या जातील. तालुक्यातील एकही गाव विकासापासून वंचित राहिलेले नाही. प्रत्येक गावात कोट्यवधींची विकासकामे मार्गी लावली आहेत. मी कायम जनतेच्या सोबत असून जनतेची सेवा करणे हेच माझे कर्तव्य आहे. मतदार संघातील जनतेचे प्रेम हीच माझी शक्ती असून या शक्तीमुळेच माझे यश निश्चित आहे. सातारा - जावली विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत असताना येथील जनतेशी माझे अतूट असे नाते निर्माण झाले आहे. विकासकामांच्या माध्यमातून मी गावागावांत आणि घराघरात पोहचलो आहे. प्रत्येकाच्या सुख- दुःखात मी सहभागी होतो. जनतेच्या समस्या सोडवतो याचे मला समाधान आहे.
आमच्या भावाला मताधिक्य देणार...
आ. शिवेंद्रराजेंच्या प्रचारार्थ सरताळे येथे गावभेट दौरा झाला. यावेळी महिला, ग्रामस्थांनी त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे सांगितले. महायुती सरकारमुळे गोर गरीब जनतेचे जीवन सुसह्य झाले आहे. सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. आ. शिवेंद्रराजे यांच्यामुळे आमच्या गावाचा सर्वांगीण विकास झाला असून या आमच्या भावाला मताधिक्य देण्याचा निर्धार महिलांनी केला. यावेळी सरपंच अमृता जाधव, दिनेश गायकवाड, सोनाली पवार, सुनील धुमाळ, बारीकराव कदम आदी उपस्थित होते.