आर. अशोकना एड्स इंजेक्शनचा कट?File Photo
Published on
:
15 Nov 2024, 11:51 pm
Updated on
:
15 Nov 2024, 11:51 pm
बंगळूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर. अशोक यांना एड्सचे इंजेक्शन देण्याचा कट आखल्याप्रकरणी बंगळूरमधील हेब्बगोडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अय्यण्णा रेड्डी यांना विशेष तपास दलाने (एसआयटी) अटक केली आहे.
अधिकारी आणि राजकीय विरोधकांना ब्लॅकमेल करणारे भाजप आमदार मुनीरत्न यांच्या हनीट्रॅप व इतर प्रकरणाची चौकशी करणार्या एसआयटीने ही कारवाई केली. आ. मुनीरत्न यांनी काही अधिकारी व राजकीय नेत्यांना हनीट्रॅपद्वारे जाळ्यात ओढले होते. त्या जोरावर त्यांनी मंत्रिपद मिळवले होते. एका माजी मुख्यमंत्र्याला त्यांनी ब्लॅकमेल करून मंत्रिपद मिळवल्याचा आरोप करण्यात आला होता. एका महिलेने त्यांच्याविरुद्ध ब्लॅकमेल आणि अत्याचाराचा आरोप केला होता. या प्रकरणाची चौकशी एसआयटी करत आहे.
चौकशीवेळी हनीट्रॅप आणि एड्स इंजेक्शनचा विषय उघडकीस आला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि प्रभावी वक्कलिग नेते आर. अशोक यांना एड्सचे इंजेक्शन देण्यात येणार होते, अशी माहिती एसआयटीला समजली. मुनीरत्न यांच्या विविध कटांमध्ये निरीक्षक अय्यण्णा यांनी मदत केल्याचे दिसून आले. यावरून त्यांना अटक करण्यात आली आहे. आर. अशोक यांना इंजेक्शन देण्यामागील कारण, हा कट कधी रचला होता, याची माहिती एसआयटी घेत आहे. अय्यण्णा हे मुनीरत्न यांच्या निकटवर्तीयांपैकी एक होते. राजराजेश्वरी, जालहळ्ळी, राजगोपालनगर, पिण्या आदी ठिकाणी त्यांनी निरीक्षक म्हणून काम केले. मुनीरत्न यांच्या शिफारसीमुळे त्यांची नियुक्ती कब्बन पार्क ठाण्यामध्ये करण्यात आली होती.