गुडाळ : बिद्री कारखान्यातील कोजन, डिस्टिलरी, विस्तारीकरणात के. पी. पाटलांनी शेकडो कोटींचा ढपला पाडलाच, पण त्याचबरोबर चिठ्ठ्यावरील रोजंदारी कामगार बोगस दाखवून गोर-गरीब कष्टकरी शेतकर्यांच्या व चिठ्ठी कामगारांच्या टाळूवरचे लोणी खाल्ले असून त्यांनी आम्हाला तत्त्वज्ञान शिकवू नये, असा टोला महायुतीचे उमेदवार आमदार प्रकाश आबिटकर यांनी लगावला. गुडाळ (ता. राधानगरी) येथे कोपरा सभेत बोलत होते. गुडाळ येथील प्रचारफेरीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
आमदार आबिटकर म्हणाले, स्व. हिंदुराव पाटील यांच्या माध्यमातून के. पी. पाटील यांनी बिद्री कारखान्यात चंचूप्रवेश केला. साखर कारखाना तुम्ही बघा आमदारकी मी बघतो, अशी शपथ देऊन माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्याशी लबाडी करून कारखाना ताब्यात घेतला. कारखान्यात पै पाहुण्यांची खोगीर भरती करून आर्थिक लुटमार चालवली आहे. कारखान्याचे संचालक 32 वर्ष व चेअरमन पदाच्या 22 वर्षाच्या कालावधीत त्यांनी खिळे-मोळे, बारदान व यंत्रसामग्री खरेदी टेंडरमध्ये 40 टक्के वाढीव दराने शेकडो कोटी रूपयांचे कमीशन खाऊन गब्बर झालेल्या के. पी. पाटील यांनी शेतकर्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात लूट करून स्वतःचे घरदार चालवले. बॉयलर ट्युबा खरेदीत लाखो रुपयांचा घोटाळा करून डुप्लीकेट ट्युबा खरेदी केल्याने 21 दिवस कारखाना बंद पडला. यामुळे सभासदांचे मोठे आर्थिक नुकसान करणार्या महागद्दार के. पी. पाटील यांना मतदार कात्रजचा घाट दाखवतील.
यावेळी पांडुरंग आवळकर यांनी प्रास्ताविक केले. युवक नेते अभिषेक डोंगळे, रविश पाटील-कौलकर, संभाजीराव आरडे, विजय महाडिक, शेखर पाटील, धीरज कळस्कर, शिवाजीराव पाटील, संग्राम पाटील गुडाळकर, मारुती पाटील, दिनकर पाटील, शिवाजी गणू पाटील, धोंडिराम पाटील, दिनकर कांबळे, सगर कांबळे, अमोल पाटील, मारुती पाटील, माळवी, बाजीराव पाटील, तानाजी पाटील, सातापा पाटील, संतोष पाटील आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोजन, डिस्टिलरी, विस्तारीकरण, यंत्रसामग्री, साखर खरेदी बारदान खरेदीचे टेंडर 40 टक्के वाढीव दराने ठेका बाहेरील ठेकेदारांना देऊन त्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची लूट केलीच, चिठ्ठीवरील रोजंदारी कामगार बोगस दाखवून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा के. पी. पाटलांनी केला असल्याचा टोलाही आमदार आबिटकर यांनी लगावला.