गुंड म्हमद्या नदाफने साथीदारावर गोळीबार केला.
Published on
:
16 Nov 2024, 1:25 am
Updated on
:
16 Nov 2024, 1:25 am
सांगली ः सांगलीतील कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ टोळीतर्गंत वादाचा गुरुवारी रात्री भडका उडाला. आर्थिक वाद आणि वर्चस्ववादातून म्हमद्याने त्याच्या टोळीतील साथीदारावर गोळीबार करून गंभीर जखमी केले. सलिम मकबूल मुजावर (वय 42, रा. गणेशनगर, सांगली) असे जखमीचे नाव आहे. पोलिसांनी गोळीबार प्रकरणी म्हमद्या नदाफासह चौघांनाही जेरबंद केले.
म्हमद्या उर्फ महमंद जमान नदाफ (वय 43, रा. अभयनगर, सांगली), इम्रान अस्लम दानवडे (वय 30, रा. रामनगर, सांगली), विजय उर्फ पप्पू बजरंग फाकडे (वय 40, रा. हरिपूर, ता. मिरज), फारूक मुस्ताक नदाफ (रा. सर्वधर्म चौक, गणेशनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यात म्हमद्या नदाफ याला दानोळी (जि. कोल्हापूर) येथून पाठलाग करून अटक करण्यात आली. इतर तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. म्हमद्या व फारूक नदाफ या दोघांना न्यायालयात हजर केले असता 19 पर्यंत कोठडी सुनावण्यात आली.
जखमी सलिम व म्हद्याचा साथीदार पप्पू फाकडे व इम्रान दानवडे हे टोळीतील साथीदार आहेत. या दोघात आर्थिक कारणावरून वाद होता. या दोघांच्या आर्थिक हितसंबंधाला धोका निर्माण केल्याने आणि अजय माने याच्याशी असलेल्या संबंधातून सलिमला जीवे मारण्याचा कट रचला. गुरुवारी रात्री म्हमद्या साथीदारासह जखमी सलिमच्या गणेशनगर येथील सर्वधर्म चौकात आला. साथीदार फारूकच्या मोबाईलवरून फोन करून सलिम याला घराबाहेर बोलविले. त्यांच्यात पुन्हा वाद झाला. यावेळी म्हमद्याने कमरेला लावलेले बंदूक काढून सलीमवर गोळीबार केला. ही गोळी सलिमच्या छातीच्या उजव्या बाजूला बरगडीजवळ घुसली. गोळीबारानंतर चौघेही पसार झाले. गणेशनगर परिसरात गोळीबार झाल्याचे समजताच पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक रितू खोखर, उपअधिक्षक विमला एम, शहरचे पोलिस निरीक्षक संजय मोरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे यांनीही घटनास्थळी धाव घेतली.
म्हमद्यावर खुनासह 25 गुन्हे दाखल
महमद नदाफ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर सांगलीसह कर्नाटक पोलिसांत खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, आर्म अॅक्ट, एनडीपीएस, चोरी आदीसह 25 गंभीर गुन्हे दाखल आहे. त्याच्यावर मोकातर्गंत कारवाईही करण्यात आली होती. सध्या तो मोक्काच्या गुन्ह्यातून जामिनावर बाहेर होता. त्याला कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात प्रवेशबंदी घालण्यात आली होती. महिन्याभरापूर्वी मिरजेत नदाफ टोळीने राडा केला होता. त्याच्या टोळीतील सदस्य इम्रान दानवडे आणि विजय उर्फ पप्पू फाकडे हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर खूनाचा प्रयत्न, खंडणी, अवैध सावकारी असे गुन्हे दाखल आहेत.
पाठलाग करून मुसक्या आवळल्या
गोळीबारानंतर म्हमद्या हा दानोळी (ता. शिरोळ) येथे जमीर नदाफ याच्या घरी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांचे पथक तातडीने दानोळीकडे रवाना झाले. त्याच्या घरात घुसून पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना पाहताच म्हमद्याने पळ काढला. पथकाने पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या.