पश्चिम महाराष्ट्रात मविआ-महायुतीत काट्याची टक्कर:एकूण 70 जागांवर हवा कुणाची
2 hours ago
1
पश्चिम महाराष्ट्र म्हणजे शरद पवारांचा गेल्या ६० वर्षांपासूनचा बुलंद गड. लोकसभेत या गडाला तडा देणे अजित पवार, भाजपला शक्य झाले नाही. मात्र, विधानसभेला प्रत्येक मतदारसंघात मविआ-महायुतीत जोरदार लढत होईल. पश्चिम महाराष्ट्रात राजकीय शह-काटशहांमुळे मनं दुखावली आहेत. परस्परांवरील विश्वास मोडीत निघालाय. निष्ठा नावापुरती उरली आहे. दिलेली आश्वासनं केव्हाच हवेत विरली आहेत. येथे महाविकास आघाडी आणि महायुतीत काट्याची टक्कर आहे. सांगलीचे बबन जगताप म्हणतात, खूप सरकारं पाहिली. अनेकदा मतदान केले, पण असा बाका प्रसंग कधीच आला नाही. एक नक्की की युती सरकारने चांगली कामे केली आहेत. कोल्हापूरकडून तुळजापूरला जाणाऱ्या भजनी मंडळातील सुनीता चव्हाण म्हणाल्या की, ‘लाडकी बहीण’ योजना चांगली आहे, पण आमच्यासारख्या नोकरदारांना त्याचा ताप अधिक झालाय. दरमहा १५०० रुपये भेटत असल्याने घरकाम करणाऱ्या महिलाच आठवडा-आठवडा दांडी मारायला लागल्यात. सांगलीत १० तालुक्यातील ८ विधानसभा मतदारसंघात ३ जागा तुतारी, २ जागा भाजप, २ जागा काँग्रेस तर १ जागा शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे. कोल्हापुरात युतीचा ‘मार्ग’ खडतर आहे. शहर विकासासाठी मागील काही वर्षांत कोट्यवधी रुपये आले, पण एकही रस्ता झाला नाही असे येथील उद्योजक संतोष कुलकर्णी सांगतात. उद्धवसेनेविषयी प्रचंड सहानुभूती असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १० पैकी ४ जागा काँग्रेस, ३ तुतारी, २ जागा इतर पक्षांना, तर एक जागा उद्धवसेनेला मिळेल. पुण्यातील २१ मतदारसंघात सर्वच पक्षांना बंडखोरांचा सामना करावा लागतो आहे. बंडखोरांची भूमिका यात निर्णायक ठरणार आहे. इथे ८ जागा अजित पवार गट, सहा जागा भाजप, चार जागा काँग्रेसला व उरलेल्या तीन जागा शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे. साताऱ्यात एकूण ८ पैकी महायुतीचे पाच व महाविकासचे तीन आमदार येतील असा अंदाज आहे. सोलापूरमध्ये सध्या ११ मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. सोलापुरात बहुमताने उमेदवार विजयी करायचेच असा चंग युतीच्या नेत्यांनी बांधला आहे. विमानतळ, समांतरचा पाणीप्रश्न अंतिम टप्प्यात असून उमेदवारांची प्रचारात दमछाक होतेय. लोकसभेपेक्षा या निवडणुकीत उमेदवार निदान विकासकामांवर बोलत तरी आहेत हीच काय ती मोठी गोष्ट असे सुनील दावडा यांना वाटते. मुजाहिद शेख हा इलेक्ट्रिक इंजिनिअर असून शहरात रोजगार संधी अधिक निर्माण होण्याची गरज त्याला वाटते. सध्याचे सोलापुरचे चित्र पाहिले तर ४ जागा भाजप, ३ तुतारी, एक जागा अजित पवार यांची राष्ट्रवादी, एक जागा उद्धवसेना, तर २ जागांवर इतरांचे पारडे जड दिसत आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)