Published on
:
15 Nov 2024, 11:47 pm
Updated on
:
15 Nov 2024, 11:47 pm
पणजी : राज्यात ’कॅश फॉर जॉब’ प्रकरणाची व्याप्ती वाढत असून हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे होत आहे. या प्रकरणात रोज नवीन पोलिस तक्रारी नोंद होत आहेत. शुक्रवारी सत्तरी आणि वास्को येथे दोन नवीन गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी राजकीय नेत्यांनी सरकारलाच घरचा ’आहेर’ दिला आहे. महसूल आणि कामगार मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सरकारी नोकरीसाठी पैसे देणार्यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी केली. त्याला उत्पल पर्रीकर यांनी समर्थन दिले आहे. या प्रकरणी विरोधी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने आक्रमक भूमिका घेत या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारला स्वतंत्र आयोग स्थापण्यासाठी सोमवार पर्यंतची मुदत दिली असून एकूणच सरकारची डोकेदुखी वाढताना दिसत आहे.
’कॅश फॉर जॉब’ प्रकरणी रोज नवी प्रकरणे समोर येत आहेत. सुरुवातीला या प्रकरणांमध्ये काही महिलांना अटक झाली होती. त्या महिलांवर नव्याने गुन्हे दाखल होत आहेत. शुक्रवारी सत्तरी तालुक्यातील माणिकराव राणे (35वर्षे) यांच्या विरोधात डिचोली पोलिस स्थानकात तक्रार दाखल झाली असून त्यांनी सरकारी नोकरीच्या बदल्यात 21.50 लाख रुपये घेतल्याची ही तक्रार आहे. वास्को येथील मंगळवारी अटक केलेल्या उमा पाटील हिच्याविरोधात आणखी एक तक्रार आली असून या गुन्ह्याची नोंद करून पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. संशयित पूजा नाईक, दीपश्री सावंत-गावस, प्रिया यादव, श्रुती प्रभुगावकर यांच्याकडून अधिकची माहिती मिळवण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. या महिलांकडूनही रोज वेगवेगळी माहिती पुढे येत आहे. या शिवाय संदीप परब, योगेश शेणवी कुंकळेकर, सूरज नाईक, गोविंद मांजरेकर यांचाही चौकशी सुरू आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही खळबळ उडाली आहे.
सोनिया, विषया यांना पोलिस कोठडी
नौदलात नोकरी देण्याचे आमिष दाखवून 16 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित सोनिया च्यारी (रा.कारवार) व विषया गावडे (रा. सां जुझे दी अरीयाल) या दोघींना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने या दोघांनाही पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दोषींवर कारवाई होणारच : मंत्री नाईक
‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणाविषयी कृषीमंत्री रवी नाईक यांना विचारले असता ते म्हणाले की, तपास योग्य दिशेने सुरू आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तपासात कोणतीच हयगय केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यातील सर्व दोषींवर कारवाई होणारच आहे. त्यामुळे ‘गॉडफादर’, ‘गॉडमदर’ सर्वजण गोत्यात येतील, असेही ते म्हणाले.
पैसे देणार्यांवरही कारवाई करा : मंत्री मोन्सेरात
आमदार गणेश गावकर यांच्या संदर्भातील ऑडिओमध्ये ’मोन्सेरात’ यांचे नाव आल्यानंतर मंत्री बाबूश मोन्सेरात आक्रमक झाले आहेत. मंत्री मोन्सेरात यांनी सरकारला घरचा आहेर देत, ज्याप्रमाणे पैसे घेणारा दोषी आहे, त्याप्रमाणे पैसे देणार्यांची ही चौकशी झाली पाहिजे, असे म्हटले आहे. याबरोबरच सरकार मालमत्ता जप्त करून वसुली करणारी यंत्रणा नसल्याचे सांगून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशीची त्यांनी मागणी केली आहे.
सखोल चौकशी व्हावी : मंत्री ढवळीकर
‘कॅश फॉर जॉब’ प्रकरण राजकारण्यांना लाज आणणारे आहे. या प्रकाराची सखोल चौकशी व्हायला हवी, असे मत मगो पक्षाचे नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केले आहे. एखाद्या गरीब कुटुंबातील माता-पिता आपल्या मुलांना कठीण परिस्थितीतून शिकवतात. मात्र, पैसे घेऊन नोकरी देण्याच्या प्रकारामुळे पात्र उमेदवारांवर अन्याय होतो. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे. मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय नक्कीच येईल. त्यानंतरच यावर आपण अधिक भाष्य करू, असे मंत्री ढवळीकर म्हणाले.
उत्पल पर्रीकरांचीही सरकारवर टीका
’कॅश फॉर जॉब’ प्रकरणी युवा नेते उत्पल पर्रीकर यांनी या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. त्यासोबतच कला अकादमी, झुआरी अॅग्रो जमीन घोटाळा, भुतानी जमीन घोटाळा या प्रकरणांचीही चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.