वरळीत मशाल… मशाल… आणि फक्त मशाल; आदित्य ठाकरेंवर मतदारराजा दिलसे फिदा!

1 hour ago 1

>> देवेंद्र भोगले

झोपडपट्टय़ांमध्ये मशाल, बीडीडी चाळीमध्ये मशाल, जुन्या चाळींमध्ये मशाल, कामगार वस्त्यांमध्ये मशाल, सी-फेसला राहणाऱया उच्चभ्रूंच्या हातीही मशाल. सर्वत्र मशाल… मशाल… आणि मशाल. हे चित्र आहे वरळी विधानसभा मतदारसंघाचे. शिवसेनेला मतदारांचा लाभणारा प्रतिसाद पाहिला तर महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे पुन्हा एकदा विधानसभेत वरळीचे प्रतिनिधित्व करणार यावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाले आहे. वरळीतील मतदारराजा आदित्य ठाकरे यांच्यावर दिलसे फिदा आहे.

वरळी मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर 1985 पर्यंत इथे काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष आणि एकदा अपक्ष आमदार राहिलेला आहे. 1990 पासून मात्र हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला बनला. शिवसेना नेते दत्ताजी नलावडे यांनी 1990 पासून 2004 पर्यंत असे चार वेळा या मतदारसंघाचे प्रभावीपणे प्रतिनिधित्व केले. 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून सचिन अहिर या मतदारसंघाचे आमदार झाले. त्यानंतर पुन्हा 2014 मध्ये शिवसेनेचे सुनील शिंदे आणि नंतर 2019 मध्ये आदित्य ठाकरे यांनी हा मतदारसंघ जिंकला. आता आदित्य ठाकरे यांच्यासह सुनील शिंदे आणि सचिन अहिर असे शिवसेनेचे तीन आमदार या मतदारसंघात नागरिकांसाठी हिरीरीने काम करत आहेत.

आदित्य ठाकरे आमदार झाल्यानंतर वरळीला ए प्लस बनवण्यासाठी त्यांनी झपाटय़ाने काम केले. त्यांच्या कामाच्या धडाक्यामुळे उच्चभ्रूंपासून झोपडीवासीयांपर्यंत त्यांची क्रेझ आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आदित्य ठाकरे यांनी पर्यटन व पर्यावरणमंत्री म्हणून उल्लेखनीय कार्य करतानाच वरळीच्या विकासासाठीही विविध कामे केली. मतदारसंघातील वरळी कोळीवाडा, पोलीस कॅम्प, बीडीडी चाळ, गणपतराव कदम मार्ग, गांधीनगर, जिजामाता नगर, प्रेमनगर, सिद्धार्थ नगर, प्रभादेवीचे कामगार नगर, लोअर परळ, डिलाईल रोड, सातरस्ता धोबीघाट, व्ही. पी. नगरमध्ये विविध विकासकामांनी आदित्य ठाकरे यांनी आपल्या आमदारकीची चुणूक दाखवली.

पदपथांचे सुशोभीकरण, रेसकोर्सभोवती

जॉगिंग ट्रक, वरळी कोळीवाडय़ात जेट्टींची बांधणी, बीडीडी चाळ पुनर्विकास, मुंबई कोस्टल रोड अशा कामांमुळे आदित्य ठाकरे यांच्यावर मतदारराजा खूश आहे. कोळीबांधवांसाठी तसेच पोलिसांच्या घरांसाठी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या कामांची वाखाणणी होत आहे. महालक्ष्मी रेसकोर्स बिल्डरांच्या घशात जाण्यापासून वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारसोबतही दोन हात केले. आदित्य ठाकरे यांचा तो धडाकेबाजपणा वरळीकरांना भावला आहे. त्यांच्या आमदारकीच्या कामांबरोबरच शिवसेना आणि युवासेनेकडून वरळी मतदारसंघात वर्षभर राबवले जाणारे विविध समाजोपयोगी उपक्रम ही शिवसेनेची उजवी बाजू आहे. विधान परिषदेच्या माध्यमातून आमदार सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांनी वरळीतील अनेक प्रश्न मांडून ते तडीस नेले. त्याचीही जोड लाभल्याने आदित्य ठाकरे यांचा दणदणीत विजय होणार यात वादच नाही.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही आदित्य ठाकरे यांनी इतर मतदारांपेक्षा आघाडी घेतली आहे. प्रचारफेऱयांमध्ये त्यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते असतात. तो प्रतिसाद पाहून मिंधे गटाचे उमेदवार मिलिंद देवरा यांना आपल्या शोभायात्रेत भाडय़ाने माणसे आणावी लागल्याची वृत्ते प्रकाशित झाली होती. त्याच्या तक्रारीही निवडणूक आयोगाकडे झाल्या. दुसरीकडे आदित्य ठाकरे यांचा वारू रोखण्यासाठी मनसेने दादरमधून वरळीत आयात केलेले उमेदवार संदीप देशपांडे यांना मतदार अनोळखी म्हणून दादच देत नसल्याचे दिसते.

वरळीतील झोपडपट्टी भागात मुस्लिम आणि दाक्षिणात्य मतदारांची मोठी संख्या आहे. तो काँग्रेसचा पारंपरिक मतदार असला तरी महाविकास आघाडीच्या झेंडय़ाखाली एकवटला आहे. त्यांची मते विधानसभेत निर्णायक ठरू शकतात. महिला मतदारांमध्येही शिवसेनेबद्दल आदर आणि आपुलकी असल्याचे आदित्य ठाकरे यांना प्रचारावेळी जागोजागी जाणवले.

मतदारांचे गणित

  • महिला मतदार – 1,19,529
  • पुरुष मतदार – 1,44,162
  • तृतीयपंथीय – 6

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article