Indian Railways Test Track: गेल्या काही वर्षांत भारतीय रेल्वेची प्रगती वेगाने सुरु आहे. एक्स्प्रेस, सुपरफॉस्ट ट्रेनवरुन देशात वंदे भारत सेमीहायस्पीड ट्रेन धावत आहे. आता बुलेट ट्रेनही येत्या एक-दोन वर्षांत सुरु होणार आहे. आता भारतीय रेल्वेने मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. भारतीय रेल्वे 800 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून टेस्ट ट्रॅक तयार करत आहे. त्यामुळे चीन, जपान, अमेरिका, जर्मनी, फ्रॉन्स, रूस या देशांच्या रांगेत भारत लवकरच बसणार आहे. राजस्थानमधील जोधपूर डिव्हिजनमध्ये हा टेस्ट ट्रॅक तयार होत आहे.
बुलेट ट्रेनची चाचणी होणार
राजस्थानमधील जोधपूर डिव्हिजनमध्ये देशातील पहिला ट्रेन ट्रायल ट्रॅक जवळपास तयार झाला आहे. 60 किमी लांब असणारा हा ट्रॅक सरळ नाही. अनेक ठिकाणी त्याला वळणे आहेत. त्यामुळे रेल्वेचा वेग कमी न करता ती कशा पद्धतीने धावू शकते, त्याची तपासणी होणार आहे. डिडवाना जिल्ह्यातील नावामध्ये तयार होणाऱ्या या ट्रॅकचे काम पूर्ण होताच 230 किमी वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेनची चाचणी होणार आहे.
कधी होणार प्रकल्प पूर्ण
नावा हे राजस्थानमधील दिडवाना जिल्ह्यातील जोधपूर विभागातील एक ठिकाण आहे. या ठिकाणी 60 किलोमीटरचा टेस्ट ट्रॅक तयार करण्यात येत आहे. जयपूरपासून सुमारे 80 किमी अंतरावर असलेल्या सांभर तलावाच्या मधोमध हा रेल्वे ट्रॅक काढण्यात आला आहे. रेल्वेच्या रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन किंवा RDSO, रेल्वेची संशोधन शाखेने दोन टप्प्यात हा ट्रॅक बांधण्यास मंजुरी दिली. पहिला टप्पा डिसेंबर 2018 मध्ये तर दुसरा टप्पा नोव्हेंबर 2021 मध्ये मंजूर झाला. डिसेंबर 2025 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. त्यावर 820 कोटी रुपये खर्च येणार आहे.
जगभरात कुठे आहे टेस्ट ट्रॅक
भारतात रेल्वे कोच, रेल्वे इंजिन चाचणीसाठी आतापर्यंत टेस्ट ट्रॅक नव्हता. नार्मल ट्रॅकवर चाचणी घेतली जात होती. आता हा टेस्ट ट्रॅक तयार होत असल्यामुळे हाय-स्पीड, सेमी-हाय-स्पीड ट्रेन आणि मेट्रो ट्रेनची चाचणी या ठिकाणी होणार आहे. जगभरात जपान, इंग्लंड या देशात तीन-तीन टेस्ट ट्रॅक आहेत. अमेरिका, पोलंड, रशियाकडे दोन-दोन टेस्ट टॅक आहे.स्पेन, रोमानिया, इटली, जर्मनी, फ्रान्सआणि चीनमध्ये रेल्वेचे टेस्ट ट्रॅक आहे.