कर्जत : कर्जत नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारामुळे पालिकेचा प्रत्येक वॉर्ड समस्यांचे माहेरघर बनले आहे. दिवसाची सुरुवात ही पालिकेच्या समस्यांनी सध्या होताना दिसते. गेल्या अनेक दिवसांपासून कर्जत नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारामुळे कर्जतचे नागरिक अक्षरशः बेजार झाले आहेत.
कर्जत शहराची पहाट ही पाणी समस्यांनी सुरू होते. सकाळी प्रत्येक नागरिकांची कामावर किंवा व्यवसायानिमित्त कामाची लगबग सुरू असते आणि पाणी न आल्याने शहरातील प्रत्येक कुटुंबाची पाण्याविना तारांबळ उडते. पाणी समस्येमुळे खरे तर महिला वर्गाला प्रखरतेने सामोरे जावे लागते. कर्जतची पाणी पुरवठा योजना आता जुनी झाल्याने त्या योजनेमध्ये पाणी पुरवठ्यासाठी वापरण्यात आलेली पाईप लाईन आत्ता जीर्ण होऊ लागल्याने आठवड्याभरात कुठे ना कुठेतरी पाईप लाईन फुटल्याचे चित्र पाहायला मिळते आणि त्या पाईप लाईन दुरुस्तीसाठी शहराचा पाणीपुरवठा बंद केला जातो. ही बाब नित्याचीच झाल्याने नागरिक पालिकेच्या कारभाराबाबत संताप व्यक्त करताना दिसत आहेत.
पहाटे पाणी समस्या सुरू झाल्यानंतर दुसरी समस्या सुरू होते ती घंटा गाडीची. घंटागाडी वेळेवर न येणे किंवा आली तरी कचरा घेऊन जाण्यास टाळाटाळ करणे यामुळे शहरात अस्वच्छतेचे प्रमाण वाढले आहे. जागो जागी कचरा पडलेला दिसतो. कचर्याच्या ढिगार्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढलेला दिसतो. डास फवारणी कधीतरी केली जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न या निमित्ताने पुढे येत आहे.
उघडी आणि अस्वच्छ गटारे यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. अशा या समस्यांकडे कर्जत पालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे जाणवत आहे. अनेक ठिकाणी गटारावरील झाकणे तुटल्याने ती झाकणे बसविण्यासाठी पालिकेला वेळ मिळत नाही. अशा या उघड्या पडलेल्या गटारात पडून एखादा अपघात घडू शकतो. पालिकेने कर्जत शहरातील अनेक ठिकाणी उघडी पडलेली गटारावरील झाकणे नव्याने बसविताना उत्तम दर्जाचे मटेरियल वापरून ती झाकणे बसविण्यात यावी अशी मागणी होत आहे.
दरम्यान, कर्जत शहराच्या विविध समस्यांबाबत डिसेंबर महिन्यात कर्जत शहर बचाव समितीचे प्रमुख कैलास मोरे यांच्या नेतृत्वाखाली पालिका प्रशासन विरोधात आंदोलन छेडले होते. सहा दिवस चालू असलेल्या आमरण साखळी उपोषणाला मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी उपोषणकर्त्यांना समस्या सोडविण्याचे आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्यास विनंती केली होती. त्यांच्या विनंतीचा आदर करून उपोषण स्थगित करण्यात आले होते. परंतु आज आंदोलनानंतर एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी होऊन देखील कर्जतच्या समस्या कमी होताना दिसत नाही. मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर आपल्या मनोगतामध्ये मी कर्जतकरांना पाणी पाजल्या शिवाय जाणार नाही, याचा मतीत अर्थ नक्की कर्जतकरांनी कसा घ्यायचा अशी चर्चा सध्या कर्जतमध्ये होताना दिसत आहे.
अकार्यक्षम अधिकारी आणि बेजबाबदार कर्मचारी यामुळे कर्जत शहराला बकाल स्वरूप आले आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पालिका प्रशासन आणि कर्जत नागरिक यांचा एकत्रित व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे . त्यावर येणार्या तक्रारी सुरवातीला सोडविण्यात देखील आल्या परंतु आज अनेक तक्रारी सोशल मीडियावर येऊन देखील अधिकारी आणि कर्मचारी मुग गिळून गप्प बसल्याचे दिसते.
कर्जत बचाव संघर्ष समितीने पालिका प्रशासन प्रमुख वैभव गारवे यांना कर्जत नागरी समस्या सोडविण्यासाठी एक महिनांपेक्षा अधिक काळ दिला तरी कर्जतच्या समस्या कमी होताना दिसत नाही. मुख्याधिकारी वैभव गारवे यांना कर्जतच्या नागरी समस्या सोडविण्यात पूर्णतः अपयश आल्याचे चित्र दिसत आहे.
त्यामुळे कर्जत शहर बचाव संघर्ष समितिचे स्थगित केलेले उपोषण पुन्हा सुरू होतेय का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
तक्रारी दाखल करण्यासाठी व्हॉटस्अॅप ग्रुप
अकार्यक्षम अधिकारी आणि बेजबाबदार कर्मचारी यामुळे कर्जत शहराला बकाल स्वरूप आले आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पालिका प्रशासन आणि कर्जत नागरिक यांचा एकत्रित व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे . त्यावर येणार्या तक्रारी सुरवातीला सोडविण्यात देखील आल्या परंतु आज अनेक तक्रारी सोशल मीडियावर येऊन देखील अधिकारी आणि कर्मचारी मुग गिळून गप्प बसल्याचे दिसते.