दुसऱ्याच्या खात्यावरून चुकीच्या पद्धतीने आरटीजीएसमधून आपल्या खात्यात आलेली तब्बल पाच लाखांची रक्कम वृत्तपत्रविक्रेते आणि कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंट असोसिएशनचे अध्यक्ष किरण व्हनगुत्ते यांनी परत केली. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नेहमीप्रमाणे पहाटेपासून पेपर वाटून दुपारी शुक्रवार पेठेत घरी आलेले किरण व्हनगुत्ते हे झोपले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास उठल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर 35 मिस्ड कॉल आल्याचे त्यांनी पाहिले. एकाच नंबरवरून वारंवार आलेल्या फोन नंबरवर त्यांनी संपर्क साधला असता, आपल्या सेव्हिंग खात्यावर तब्बल पाच लाख रुपये चुकीच्या आरटीजीएसमुळे जमा झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने बँकेत जाऊन, याची शहानिशा करून, आपल्या खात्यात एका कंपनीकडून चुकून आलेली ती रक्कम परत करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केली.
संबंधित कंपनीच्या मालकांनी व्हनगुत्ते यांची भेट घेऊन चांदीची श्री गणेशाची मूर्ती देऊन त्यांचे आभार मानले. रस्त्यावर सापडलेले पैसे उचलायचे नाहीत. घरी आणले तरीही ते एका पिशवीत ठेवायचे आणि वर्षभरानंतर दान करायचे, ही त्यांच्या आईची शिकवण असल्याचे व्हनगुत्ते यांनी सांगितले.