लातूर जिल्ह्यातील चित्र : सत्ताधारी पक्षांवर मतदाराचा विश्वास
– महादेव कुंभार
लातूर (Latur Election Results) : राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि या निकालातून राज्यातील तमाम जनतेने आपण सुखी, समाधानी असण्यावर शिक्कामोर्तब केले. ज्या ज्या वेळी सत्ताधारी पक्षांवर जनता भरभरून विश्वास व्यक्त करते, त्या त्यावेळी सत्ताधारी पक्षांवर जनता समाधानी असते, असा याचा अर्थ असून राज्यातल्या विधानसभा निवडणुकीबरोबरच लातूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीतूनही लातूर जिल्ह्यातील मतदारांनी हाच संदेश अधोरेखित केला आहे.
लातूर जिल्ह्यात (Latur Election Results) लातूर शहर विधानसभा मतदारसंघात अटीतटीची लढत झाली. काँग्रेसचे अमित देशमुख 7 हजार 73 मतांनी विजयी झाले. राजकारणात नव्याने उतरलेल्या अर्चनाताई पाटील यांनी या मतदारसंघात दिलेली लढत कौतुकास्पद आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात विधान परिषदेचे सदस्य असलेले रमेशआप्पा कराड यांनी गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने ठेवलेल्या जनसंपर्काचा या निवडणुकीत परिणाम दिसून आला. काँग्रेसचे धीरज देशमुख यांचा या मतदारसंघात थेट जनसंपर्क नसल्याने त्याचा फटका बसला. कराड यांनी धीरज देशमुख यांचा 6754 मतांनी पराभव केला.
जिल्ह्यात लक्षवेधी लढत राहिली निलंगा मतदार संघाची. माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांंच्याशी काँग्रेसच्यावतीने मैदानात उतरवलेल्या अभय साळुंखे यांनी अटीतटीची लढत दिली. साळुंखे यांचा निलंगेकरांनी 13 740 मतांनी पराभव केला. (Latur Election Results) विधानसभा निवडणुकांचा अनुभव प्रत्यक्षात नसलेल्या साळुंखे यांच्या लढतीने डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यानंतर या मतदारसंघात काँग्रेसचे नवे नेतृत्व उदयास आले आहे.
उदगीर विधानसभा मतदारसंघात क्रीडामंत्री संजय बनसोडे यांचे काम मतदारांनी मनापासून स्वीकारले. बनसोडे यांनी केलेल्या कामासोबतच त्यांच्या जनसंपर्काला मतदारांनी दाद देत बनसोडे यांना विक्रमी मताधिक्य म्हणजे 92 हजार 61 मतांची आघाडी दिली. त्यांनी सुधाकर भालेराव यांचा पराभव केला.
औसा विधानसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे पक्षाची प्रचार यंत्रणा राबविण्यात अभिमन्यू पवार यशस्वी झाले. त्यांनी केलेल्या विकासकामांना मतदारांनी उचलून धरले. या मतदारसंघात अभिमन्यू पवार यांनी 34 हजार 564 मताधिक्य मिळवत दिनकरराव माने यांचा पराभव केला. (Latur Election Results) अहमदपूर विधानसभा मतदारसंघात बाबासाहेब पाटील यांना तिहेरी लढतीचा चांगलाच लाभ झाला. तब्बल 31 ६६९ मताधिक्य मिळवत त्यांनी विनायकराव पाटील यांचा पराभव केला.