निटूर (Latur) :- १५ ते २० वर्षांपूर्वी निलंगा तालुक्यातील अनेक गावांत गुऱ्हाळे अस्तित्वात होती. साधारणतः दिवाळी ते गुढीपाडवा यादरम्यान गुन्हाळ सुरू असायची. मात्र सध्या असलेले गुऱ्हाळे कामगारांचा तुटवडा, वाढता उत्पादन खर्च, गूळदरात होत असलेली घसरण, अशा अनेक संकटांना तोंड देत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटनामागे किमान दीड हजार रुपये फायदा करून देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनीही गुऱ्हाळ चालकांना मनुष्यबळ पुरविण्यासाठी मदतीचा हात देण्याची गरज निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांनी गुऱ्हाळ चालकांना मनुष्यबळ पुरविण्याची गरज
२० वर्षांपूर्वी निलंगा तालुक्यातील प्रत्येक गावात तालुक्यात गावात १५ ते २० शेतकऱ्यांच्या शेतात गुऱ्हाळे होती. दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर सुरु झालेली गुऱ्हाळे पावसाळा तोंडावर येईपर्यंत चालायची. मात्र साखर(Sugar) कारखानदारीमुळे शेतकऱ्यांचे गुळ उद्योग अर्थात् गुऱ्हाळे नामशेष होत गेली. निलंगा तालुक्यात हाडगा, राठोडा, मसलगा, शेडोळ बाकली, निटूर, बसपूर आदी गावात एकही गुऱ्हाळघर शिल्लक राहिले नाही. केवळ मांजरा काठावरील कांही गावात व केळगाव, काटेजवळगा, गिरकचाळ, ताजपूर या गावांमध्ये २ ते ४ ठिकाणी गुऱ्हाळे टिकून आहेत. एक गुऱ्हाळ चालविण्यासाठी गुळव्या, जाळव्या, कढईवाला, चरखा चालविणे, ऊस तोडणी, वाहतूक आदी कामांसाठी किमान २० लोक लागतात.
कारखाने एका टनाचे ३ हजार रुपये भाव देतात
मात्र तेवढ्या प्रमाणात कामासाठी माणसे उपलब्ध होत नाहीत. माणसे मिळाली तर गुळव्या आणि जाळव्या मिळत नाही, अशा अनंत अडचणीमुळे शेतकरी कारखान्यांना ऊस देण्यासाठी पसंदी देतात. कारखाना आणि गुळ याचा विचार केला तर कारखान्यांपेक्षा गुळ उद्योग आजच्या परिस्थितीत परवडणारा असून कारखाने एका टनाचे ३ हजार रुपये भाव देतात तर त्याच उसाचा गूळ केल्यास गुळ विक्रीतून खर्च वजा जाता शेतकऱ्यांना ४५०० रुपये मिळतात. म्हणजे प्रति टनामागे शेतकऱ्यांना दीड हजार रुपये जास्त मिळू शकतात मात्र त्यासाठी गुऱ्हाळे घालून ती ती चालवण्याची तयारी शेतकऱ्यांनी ठेवली पाहिजे.