सेन्सेक्स, निफ्टी आज घसरणीसह बंद झाले. झाले.(file photo)
Published on
:
03 Feb 2025, 11:22 am
Updated on
:
03 Feb 2025, 11:22 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅनडा, मेक्सिको आणि चीनवर अतिरिक्त आयात कर लावण्याच्या घोषणेचे सोमवारी आशियाई बाजारात तीव्र पडसाद उमटले. भारतीय शेअर बाजारालाही (Stock Market) याचा फटका बसला. सेन्सेक्स (Sensex) ३१९ अंकांनी घसरून ७७,१८६ वर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) १२१ अंकांच्या घसरणीसह २३,३६१ वर स्थिरावला.
गुंतवणूकदारांना ४.३६ लाख कोटींचा फटका
३ फेब्रुवारी रोजी बीएसईवरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ४.३६ लाख कोटी रुपयांनी कमी होऊन ते ४१९.४८ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले. शनिवारी १ फेब्रुवारी रोजी बाजार भांडवल ४२३.८४ लाख कोटी रुपयांवर होते.
बाजारात विक्रीचा दबाव कायम
देशांतर्गत बाजारात विक्रीचा दबाव कायम राहिला. निफ्टी ऑईल आणि गॅस २.५ टक्के घसरला. निफ्टी आयटी आणि निफ्टी ऑटो हे दोनच क्षेत्रीय निर्देशांक अनुक्रमे किरकोळ ०.६ टक्के आणि ०.९ टक्के वाढले. उर्वरित ११ निर्देशांकांत घसरण दिसून आली. ज्यात निफ्टी ऑइल अँड गॅस, निफ्टी मेटल आणि निफ्टी एनर्जी प्रत्येकी २ ते ३ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप ०.८ टक्के, स्मॉलकॅप १.७७ टक्के घसरला.
ट्रम्प यांच्या कर लावण्याच्या घोषणानंतर प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये ट्रेड वॉरची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे निफ्टी मेटल निर्देशांक १.७ टक्के घसरला. मेटलमध्ये नॅशनल ॲल्युमिनियम, एपीएल अपोलो ट्यूब्स आणि स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाचे शेअर्स प्रत्येकी ४ टक्के घसरले.
कोणते शेअर्स घसरले, कोणते वाढले?
सेन्सेक्सवरील ३० पैकी ११ शेअर्स आज तेजीसह बंद झाले. त्यात बजाज फायनान्स, एम अँड एम, बजाज फिनसर्व्ह, भारती एअरटेल, मारुती हे शेअर्स सर्वाधिक वाढले. तर १९ शेअर्स घसरणीसह बंद झाले. त्यात एलटीचा शेअर्स ४.६ टक्के घसरणीसह टॉप लूजर ठरला. त्याचबरोबर टाटा मोटर्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, पॉवर ग्रिड, एनटीपीसी, आयटीसी, रिलायन्स हे शेअर्सही घसरले.
डॉलर मजबूत, रुपया निचांकी पातळीवर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीनच्या उत्पादनावर कर लागू (Donald Trump imposes tariffs) करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे डॉलर निर्देशांक एक टक्केहून अधिक वाढला. दरम्यान, आज भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत ८७.२९ या सर्वकालीन निचांकी पातळीवर पोहोचला.