जळगाव : जिल्ह्यातील वाळू धोरण ठरवण्यासाठी शासनाने नागरिकांच्या सूचनांचा विचार करण्यासाठी आज 3 रोजी आयोजित केलेल्या खुल्या बैठकीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी वाळू धोरणाचे सादरीकरण केले. यावेळी नागरिकांनी आप आपल्या सूचना मांडल्या. या चर्चासत्राला नागरिकांचा प्रतिसाद, वाळू धोरणावर लिखित अभिप्राय देखील भरून दिलेत
जिल्हाधिकारी कार्यालयात वाळू धोरणावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते या चर्चासत्रात वाळू व्यवसायाशी संबंधित व्यावसायिक, स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. काही नागरिकांनी अवैध वाळू उपशामुळे होणारे पर्यावरणीय दुष्परिणाम मांडले, तर काहींनी वाळू उपसा नियंत्रित करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापराची शिफारस केली. याशिवाय, स्थानिक व्यावसायिकांनी वाळू वाहतुकीसाठी सुलभ परवान्यांच्या प्रक्रियेची मागणी केली. अनेकांनी वाळूचा काळाबाजार रोखण्यासाठी डिजिटल ट्रॅकिंग आणि जीपीएस आधारित प्रणाली लागू करण्याचा प्रस्ताव दिला.
बैठकीत नागरिकांनी लेखी अभिप्राय देखील दिले, जे पुढील धोरण ठरवण्यासाठी उपयोगी ठरणार आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकांच्या सूचनांचा गांभीर्याने विचार करून अंतिम वाळू धोरणात आवश्यक बदल करण्याचे आश्वासन दिले.
राज्य शासनाच्या पुढील निर्णयानुसार नवीन वाळू धोरण लवकरच जाहीर होणार असून, नागरिकांच्या सूचनांचा त्यात समावेश करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. त्यानुसार आज नागरिकांनी लिखित स्वरूपात दिलेले सूचनांचा वाळू धोरण तयार करताना उपयोग केला जाणार असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.