गळ्यात फास अडकल्याने वाघीण जखमी झाली. pudhari photo
Published on
:
03 Feb 2025, 3:24 pm
Updated on
:
03 Feb 2025, 3:24 pm
यवतमाळ : कमी अधिवास असूनही टिपेश्वर अभयारण्यात वाघांची सर्वाधिक संख्या आहे. येथील वाघ संपूर्ण राज्यात स्थलांतर करीत आहे. त्यामुळे शिकारी याचा फायदा घेत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या अभयारण्यात काही दिवसांपासून पीसी वाघिणीच्या गळ्यात तारांचा फास अडकला आहे. मोठी जखम झाली असून, ही वाघीण मदतीसाठी भटकत आहे. या वाघिणीला तीन पिले आहेत. तिच्यावर वेळेत उपचार झाले नाहीत, तर वाघिणीसोबत पिलांच्याही जीविताला धोका निर्माण झाला आहे.
जखमी वाघिणीचे छायाचित्र सोशल मीडिया आल्यानंतर वनविभागाला जाग आली आहे. रविवारी येथे अमरावतीचे पथक दाखल झाले आहे. तिचा शोध घेतला जात आहे. वन्यजीव विभागाने विदर्भात हाय अलर्ट जारी केला आहे. वाघांची शिकार करणारी बहलोयी टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे सांगण्यात येत आहे. असा अलर्ट असताना टिपेश्वर अभयारण्यात वाघाच्या बाबातील दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. येथील पीसी वाघीण काही दिवसांपासून गळ्यात अडकलेल्या फासासह फिरत आहे.
वाघिणीच्या गळ्यात असलेला फास जवळपास आठ दिवसांपासून अडकल्याची चर्चा आहे. आठ दिवसांपूर्वी घटना घडूनही वन्यजीव विभागाचे कर्मचारी, अधिकाऱ्यांना याबाबत माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, वाघिणीला फासातून सोडविण्यासाठी कोणतेच प्रयत्न झाले नसल्याची देखील माहिती आहे. वाघिणीचे फोटो समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर वन्यजीव विभागाला जाग आली असून रविवारपासून (ता.२) 'रेस्क्यू ऑपरेशन' सुरू करण्यात आले आहे.
हमखास व्याघ्रदर्शन होणारे पर्यटनस्थळ
टिपेश्वर अभयारण्य गेल्या काही वर्षांपासून हमखास व्याघ्रदर्शन होणारे पर्यटनस्थळ म्हणून पुढे आले आहे. राज्य तसेच राज्याबाहेरील पर्यटकांची संख्याही वाढली आहे. टिपेश्वर अभयारण्यात वाघांची संख्या मोठी आहे. यामुळे या भागाकडे पर्यटकही आकर्षित होत आहे.