नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा- सोमवारी संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी महाकुंभात चेंगराचेंगरीमुळे झालेल्या मृत्यूंवरून विरोधकांनी दोन्ही सभागृहात गोंधळ घातला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी केली. मागणी पूर्ण न झाल्याने विरोधकांनी सभात्याग करून निषेध व्यक्त केला.
प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांची 'खरा' आकडा जाहीर करण्याची मागणी विरोधी पक्षाच्या खासदारांनी केली. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेवर काँग्रेस खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपले भाषण केले. ते म्हणाले की, माझे भाषण सुरू करण्यापूर्वी मी महाकुंभातील मृतांना, कुंभात प्राणांची आहुती देणाऱ्या हजारो लोकांना श्रद्धांजली अर्पण करतो. खर्गे यांच्या या विधानानंतर सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावर खर्गे म्हणाले की हा माझा अंदाज आहे. जर हे चुकीचे असेल तर मला सांगा. जर हे खरे नसेल तर सत्य काय आहे, ते मला सांगा.
राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी खर्गेंना त्यांचे हजारो लोकांच्या मृत्यूचा उल्लेख केलेले विधान मागे घेण्यास सांगितले. त्यावर खर्गे म्हणाले की, हा माझा अंदाज आहे. जर आकडे बरोबर नसतील तर सरकारने सत्य काय आहे ते सांगावे. मी कोणालाही दोष देण्यासाठी ‘हजारो’ असे म्हटले नाही. परंतु किती लोक मृत पावले, याची माहिती देण्यात यावी, असेही खर्गे म्हणाले.