अमरावती, पुढारी वृत्तसेवा: प्रयागराज येथे महिंद्रा एसयुव्ही कार बेवारस असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला होता. दरम्यान आता त्या वायरल व्हिडिओचे सत्य समोर आले आहे. विशेष म्हणजे व्हिडिओ मधील कार ही अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील असल्याचे सांगण्यात येत होते. प्रयागराज येथील चेंगराचेंगरी दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान ही कार आणि भाविक सोमवारी 3 फेब्रुवारी रोजी परतवाडा येथे सुखरूप प्रयागराज येथून परतले आहे.
प्रयागराज येथे परतवाडा येथील काही भाविक महिंद्रा एसयुव्ही एमएच 27 डीएल 7290 क्रमांकाच्या कारने कुंभमेळ्यात गेले होते. दरम्यान ही गाडी पाच ते सहा दिवसापासून बेवारस स्थितीत प्रयागराज मध्ये असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पण ही कार संकेत अग्रवाल नामक व्यक्तीची असून ते आपल्या मित्रासह प्रयागराज येथे दर्शनासाठी गेले होते.
संकेत यांनी परतवाडा येथे परत आल्यावर सांगितले की, आम्ही 31 जानेवारी रोजी अमरावती परतवाडा येथून प्रयागराज करिता निघालो होतो. मात्र व्हिडिओमध्ये 28 जानेवारी पासून संबंधित कार प्रयागराज येथे बेवारस असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र तो दावा खोटा असून कृपया गाडीचा तो व्हिडिओ व्हायरल करू नये, अशी विनंतीही संकेत अग्रवाल यांनी केली. आम्ही 30 जानेवारी रोजी प्रयागराज येथे गेलो होतो. तेथून स्नान करून 3 फेब्रुवारी रोजी अमरावतीत सुखरूप परतलो आहे, असेही संकेत यांनी सांगितले.
प्रयागराज येथे झालेल्या चेंगराचेंगरी दरम्यान हे भाविक प्रयागराज येथे नव्हतेच तर 30 जानेवारी रोजी हे सर्व परतवाडा येथून प्रयागराजकरिता जाण्यासाठी निघाले होते. आणि तेथून सुखरूप अमरावतीत सोमवारी परतले आहेत. दरम्यान तो वायरल व्हिडिओ फेक असल्याचे समोर आले आहे.