यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : एका शेतकरी महिलेने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले. ही घटना घाटंजी तालुक्यातील मोवाडा (लहान) येथे १ फेब्रुवारीला सांयकाळच्या सुमारास गावातील शेतालगत असलेल्या एका विहिरीत उघडकीस आली.
इंदिरा शंकर परचाके (वय ६०) रा.मोवाडा लहान ता. घाटंजी असे मृत महिलेचे नाव आहे. मृतक महिला ही ३१ जानेवारीला सकाळी घरून शौचास जाण्यासाठी निघून गेली होती. मात्र, उशीरापर्यंत घरी परत आली नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १ फेब्रुवारीला घाटंजी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर गावाजवळील शेतातील नवीन विहिरीत गळ टाकून पाहणी केली, असता महिलेचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती घाटंजी पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मृत महिलेला तीन मुले, सुना व नातवंड असा परिवार आहे. मृतक महिलेवर बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्ज असल्याची माहिती पोलिसांना मुलाने दिलेल्या फियार्दीत नोंद आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.