गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्यची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या कॅबिनेटच्या बैठकीला देखील ते उपस्थित नव्हते, तसेच त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत आणखी एक बैठक बोलावली होती, या बैठकीला देखील शिंदे यांनी दांडी मारली. त्यानंतर एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा सुरू झाल. यावर आता एकनाथ शिंदे यांनी मोठा खुलासा केला आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
रखडलेले प्रकल्प आणि विकासाचे प्रकल्प यांना आपण चालना दिली, लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण सुरू केल्या. लाडकी बहीण योजना यशस्वी झाली, लाडका भाऊ, लाडके शेतकरी, ज्येष्ठ लोकांसाठी देखील योजना आपण आणल्या, एसटीमध्ये महिलांना 50 टक्के सवलत आपण दिली. लेक लाडकी लखपती योजना आपण सुरू केली. विधानसभा निवडणुकीत महिलांनी मोठा विजय मिळवून दिला. विरोधकांचं डिपॉझिट जप्त केलं. त्यामुळे आता सरकारची जबाबदारी आणखी वाढली आहे. विरोधक कितीही काय बोलले तरी लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही .जे आम्ही बोलतो ते करतो, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा सध्या सुरू आहे, यावर देखील त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. मी समाधानी आहे .पद येतात आणि जातात पद वर खाली होतात. यावेळेस या राज्यातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून माझी ओळख निर्माण झाली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदापेक्षा माझ्यासाठी हे सर्वात मोठ पद आहे, असे मी मानतो, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, तुम्ही काळजी करू नका. तुमच्या लाडक्या भावाकडे हाउसिंग आणि नगर विकास मंत्रालय आहे. प्रकल्प कोणी थांबू शकत नाही. मी जे बोलतो ते करतो, महाराष्ट्रातील सर्व रखडलेले प्रकल्प मला मार्गी लावायचे आहेत, असं यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे.