Published on
:
03 Feb 2025, 5:25 pm
Updated on
:
03 Feb 2025, 5:25 pm
वर्धा : वयोवृद्धांना तीर्थ दर्शन घडावे या हेतूने राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. योजनेतील पात्र लाभार्थ्यांपैकी ८०० भाविकांचा जथ्था लवकरच अयोध्या येथे तीर्थ दर्शनासाठी पाठविण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीची कार्यवाही समाजकल्याण सहाय्यक कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. याच कार्यालयाच्या माध्यमातून या योजनेच्या लाभासाठी अर्ज मागविण्यात आले. देण्यात आलेल्या मुदतीत ४ हजार १६९ व्यक्तींचे अर्ज वर्धेच्या समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयाला प्राप्त झाले. या प्राप्त अर्जांची छाननी केल्यावर ३ हजार ३५५ अर्ज योजनेच्या लाभासाठी पात्र ठरविण्यात आले.
पहिल्या टप्प्यात पात्र लाभार्थ्यांपैकी १ हजार व्यक्तींना त्यांनी नोंदविलेल्या तीर्थदर्शनासाठी पाठविण्याचे निश्चित करून त्याबाबतचा प्रस्ताव पुणे येथील आयुक्त कार्यालयाला पाठविण्यात आला. संबंधित प्रस्तावावर सहानुभूती पूर्वक विचार होत ८०० भाविकांचा जथ्था लवकरच अयोध्या येथे पाठविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. शिवाय त्यासाठी आयआरसीटीसी सोबत पुणे येथील आयुक्त पातळीवर करारही करण्यात आला आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात या योजनेच्या लाभासाठी एकूण ४ हजार १६९ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ३ हजार ३५५ अर्ज योजनेच्या लाभासाठी पात्र ठरविण्यात आले आहे. यात ३७१ महिला तर ४२९ पुरुषांचा समावेश असल्याचे समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशनी तेलगोटे यांनी सांगितले.
शासनच उचलणार प्रवास, निवास अन् भोजनाचा खर्च
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या लाभासाठी पात्र ठरलेल्या वयोवृद्धाचा प्रवास, निवास व भोजनाचा खर्च शासन उचलणार आहे. या याजनेच्या लाभासाठी लाभार्थ्याचे वय ६० प्लस असणे आवश्यक आहे. शिवाय तो महाराष्ट्रातील रहिवासी असावा तसेच त्याचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्याला ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागतो. अर्ज करताना अर्जासोबत आधारकार्ड, रेशनकार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्रातील जन्म दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र, फोटो, नातेवाईकासह स्वत:चा मोबाईल क्रमांक आदी संलग्न करणे गरजेचे आहे.
राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थ दर्शन योजना सुरु केली असल्याचे समजल्यावर यासाठी अर्ज केला. अर्ज मंजूर झाल्याचे दुरध्वनी व्दारे कळविण्यात आले असल्याने माझी अयोध्या व इतर धार्मिक स्थळांना शासनाच्या खर्चाने भेट देऊन दर्शनाची इच्छा पूर्ण होणार आहे. त्यामुळे मी खूप आनंदी आहे, अशी प्रतिक्रिया सुरेश चंपतराव चिंचोळकर यांनी दिली.