Published on
:
03 Feb 2025, 3:27 pm
Updated on
:
03 Feb 2025, 3:27 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : चॅम्पियन्स ट्रॉफी येत्या 19 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघांचीही घोषणा करण्यात आली आहे. ‘बीसीसीआय’नेदेखील टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघाची निवड केली होती, ज्यामध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नावाचाही समावेश आहे. मात्र, जसप्रीत बुमराह 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी खेळू शकेल की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही. तो सध्या ‘एनसीए’मध्ये उपचार घेत आहे.
जसप्रीत बुमराह सध्या पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. दरम्यान, बुमराह बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) मध्ये पोहोचला आहे. मीडिया रिपोर्टर्सनुसार, तो तिथे किमान तीन दिवस राहण्याची शक्यता आहे.
यादरम्यान तो ‘बीसीसीआय’च्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली असेल. त्याचबरोबर जसप्रीत बुमराहच्या दुखापतीचे स्कॅनही केले जाणार आहे.
यानंतर सेंटर ऑफ एक्सलन्सचे तज्ज्ञ आपला अहवाल राष्ट्रीय निवड समितीला सादर करतील. बुमराहला वैद्यकीय संघाकडून क्लीन चिट मिळाली तरच तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू शकेल.