गडचिरोली : सुमारे २८ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या दोन नक्षल दाम्पत्यांनी आज जिल्हा पोलिस आणि केंद्रीय राखीव दलापुढे आत्मसमर्पण केले. यात एक विभागीय समिती सदस्य, एक एसीएम आणि दोन दलम सदस्यांचा समावेश आहे.
अशोक पोचा सडमेक उर्फ बालन्ना उर्फ चंद्रशेखर(६३), वनिता दोहे झोरे(५४), साधू लिंगू मोहंदा उर्फ शैलेश उर्फ समीर(३०) आणि मुन्नी पोदिया कोरसा(२५) अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलींची नावे आहेत. अशोक सडमेक आणि वनिता दोहे व साधू मोहंदा आणि मुन्नी कोरसा हे पती-पत्नी आहेत. अशोक आणि वनिता हे नक्षल चळवळीतील वरिष्ठ कॅडर आहेत.
अशोक सडमेक अहेरी तालुक्यातील अर्कापल्ली येथील मूळ रहिवासी असून, तो नक्षल्यांच्या तांत्रिक समितीचा विभागीय समिती सदस्य होता. १९९१ मध्ये तो अहेरी दलममध्ये सहभागी झाला. त्यानंतर विविध दलममध्ये काम केल्यानंतर त्याला विभागीय समिती सदस्य बनविण्यात आले होते. त्याच्यावर ८२ गुन्हे दाखल आहेत. शासनाने त्याच्यावर १६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
वनिता झोरे ही एटापल्ली तालुक्यातील कोरनार येथील रहिवासी आहे. १९९३ मध्ये एटापल्ली दलममध्ये भरती झाली. विविध दलममध्ये काम केल्यानंतर ती सध्या तांत्रिक समितीत एसीएम पदावर कार्यरत होती. तिच्यावर ११ गुन्ह्यांची नोंद असून, शासनाने ६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
साधू मोहंदा हा भामरागड तालुक्यातील तुमरकोडी येथील रहिवासी आहे. तो २०११ मध्ये जनमिलिशिया म्हणून भरती झाला. सध्या तो प्लाटून क्रमांक ३२ चा सदस्य होता. त्याच्यावर ४ गुन्हे दाखल असून, शासनाने ४ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
मुन्नी कोरसा ही छत्तीसगड राज्यातील सुकमा जिल्ह्यातील सिलिगेर येथील रहिवासी आहे. २०१५ मध्ये ती बासागुडा दलममध्ये भरती झाली. सध्या ती माड डिव्हीजनमध्ये जनताना सरकारच्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. तिच्यावरील गुन्ह्यांची पडताळणी सुरु आहे. शासनाने तिच्यावर २ लाखांचे बक्ष्रीस जाहीर केले होते, असे पोलिसांनी सांगितले.
२०२२ पासून ५०, तर २००५ पासून आतापर्यंत ६९५ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. दरम्यान, जे नक्षलवादी विकासकामात आडकाठी आणतील, त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, तर ज्यांना लोकशाही पद्धतीने जीवन जगायचे आहे, त्यांना पोलिस दल सर्वतोपरी मदत करेल,
पोलिस अधीक्षक नीलोत्पल