वडिलांच्या न्यायासाठी प्रसंगी मरण सुद्दा पत्कारायची तयारी : वैभवी देशमुखpudhari photo
Published on
:
03 Feb 2025, 3:52 pm
Updated on
:
03 Feb 2025, 3:52 pm
केज : माझ्या वडिलांच्या हत्यारांना जो पर्यंत कठोर शिक्षा होत नाही आणि न्याय मिळत नाही; तो पर्यंत आम्ही मागे हटणार नाही. प्रसंगी वडिलांच्या न्यायासाठी मरण सुद्धा पत्करायला लागले तरी त्याची सुद्धा तयारी आहे. असे अत्यंत भावुक उद्गार संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने प्रसार माध्यमांशी बोलताना काढले . तसेच हत्या प्रकरणातील पुरावे नष्ट झाल्यास त्याला तपास यंत्रणा आणि प्रशासन जबादार असेल. असे धनंजय देशमुख म्हणाले. तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यावर आम्हाला विश्वास आहे. असा विश्वास देखील व्यक्त केला.
या बाबतची माहिती अशी की, संतोष देशमुख हत्या प्रकरणी भगवान गडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी केलेल्या वक्तव्या नंतर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख, मुलगी वैभवी देशमुख, मुलगा विराज व गावकऱ्यांनी भगवान गडावर जावून महंत नामदेव महाराज शास्त्री यांची भेट घेतली व मारेकरी आणि त्यांना मदत करणाऱ्यांची माहिती व पुरावे दिले. तसेच देशमुख कुटुंबीय हे संत भगवान बाबा यांचे भक्त होते आणि यात कोणताही जातीवादाचा मुद्दा नाही. हे सांगितले.
त्यानंतर दि. ३ फेब्रुवारी रोजी वैभवी देशमुख हिने आपले वडील संतोष देशमुख यांच्या हत्ये संदर्भात आणि तपासा संदर्भात माध्यमांशी बोलताना म्हणाली की, यातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी आणि त्यांना फासावर लटकावायला हवे. यासाठी त्यांचे कुटुंब हे शेवट पर्यंत ही न्यायाची लढाई लढत राहणार आहेत. प्रसंगी यासाठी मरण जरी पत्करावे लागले; तरी वडिलांच्या न्यायासाठी त्याची सुद्धा तयारी असल्याचे भावनिक उद्गार काढले.
पुरावे नष्ट झाले तर त्याला तपास यंत्रणा आणि प्रशासन जबाबदार
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा तत्कालीन तालुका अध्यक्ष विष्णू चाटे याचा गुन्ह्यातील मोबाईल अद्यापही सापडत नाही. म्हणून त्याच्यावर पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. परंतु फक्त पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करून भागणार नाही; तर सर्व पुरावे हस्तगत करावे लागतील आणि जर पुरावे नष्ट झाले. तर तपास यंत्रणा आणि प्रशासन याला जबाबदार असेल. असे संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख म्हणाले. तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या अजित पवार गटाच्या केज येथील संपर्क कार्यालयात संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींचा राबता होता. हे त्यांना पाठीशी घालणाऱ्याना कसे समजत नाही ? असे मंत्री धनंजय मुंडे यांचे थेट नाव न घेता धनंजय देशमुख म्हणाले.
सोशल मीडियातील पोस्ट मधून त्यांना गंभीर स्वरूपाच्या धमक्या येत आहेत. या बाबत धनंजय देशमुख हे त्याची माहिती तपास यंत्रणेला देणार आहेत. तसेच संतोष देशमुख यांच्या हत्ये संदर्भातील आणखीही काही पुरावे हाती येणार असल्याची त्यांनी माहिती दिली.
धनंजय देशमुख यांनी भगवान गडावर जावून महंत नामदेव महाराज शास्त्री यांना सर्व पुरावे आणि फोटो दिल्या नंतर तसेच आवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला झालेली मारहाण आणि संतोष देशमुख यांची हत्या यामुळे देशमुख कुटुंब आणि गावकरी यांची मानसिकता काय असेल ? परंतु त्यांची कायदा आणि न्याय व्यवस्था याच्यावर विश्वास असल्यानेच त्यांनी सर्व माहिती पोलीस ठाण्यात देवून कारवाईची मागणी केली होती. असे वैभवी देशमुख आणि धनंजय देशमुख यांनी सांगितले.
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर विश्वास
धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार व एकनाथ शिंदे या दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यावर विश्वास व्यक्त केला मात्र गुन्हेगारांना मदत करणाऱ्या काहींच्या हे कसे लक्षात येत नाही ? असा प्रश्न देखील उपस्थित केला.