पनवेल : ओव्हरटेकिंग केल्याच्या राग मनात धरून खारघर मध्ये एका दुचाकीस्वारांची हत्या केल्याची धक्कादायक घटना खारघर मधील उत्सव चौक परिसरात घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मारहाण करणाऱ्या व्यक्तीने मृत व्यक्तीच्या डोक्यात हेल्मेट मारून हत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
शिवकुमार शर्मा वय ४५ राहणार वाशी असे मयत दुचाकीस्वारांचे नाव आहे. शिवकुमार शर्मा हे काही कामानिमित्ताने खारघर परिसरात दुचाकीने आले होते. शर्मा बेलपाडाकडून उत्सव चौकाकडे जात असताना शर्मा दुसऱ्या दुचाकीला ओव्हरटेक करत पुढे निघाले, याच वेळी ओव्हरटेक का केली याचा राग मनात धरत दुसऱ्या दुचाकीवर असलेल्या दोन युवकांनी शर्मा यांना अडवून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, त्यानंतर या दोन युवकांनी स्वतःच्या हातातील हेल्मेट ने शर्मा यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. शर्मा यांच्या डोक्यात वारंवार हेल्मेट मारून शर्मा यांना रक्तबंबाळ केले आणि घटना स्थळावरून निघून गेले. डोक्यातील रक्तस्त्राव अधिक असल्याने त्याचा मृत्य झाला. या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून हत्या करणाऱ्या दोन युवकाचा शोध सुरू केला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी साडेपाचच्या आसपास झाली आहे.