ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज ट्रॅव्हिस हेडला अॅलन बॉर्डर पदक जाहीर झाले.
Published on
:
03 Feb 2025, 1:35 pm
Updated on
:
03 Feb 2025, 1:35 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज ट्रॅव्हिस हेडला अॅलन बॉर्डर पदक जाहीर झाले आहे. या प्रतिष्ठित ऑस्ट्रेलियन पुरस्कारासाठी त्याला जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्सपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. 2024 मध्ये, हेडने खेळाच्या तिन्ही स्वरूपात चांगली कामगिरी केली. ज्यामुळे त्याला क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) द्वारे 'वनडे प्लेअर ऑफ द इयर' म्हणून निवडण्यात आले आहे.
अॅलन बॉर्डर पदकासाठी हेडला 208 मते मिळाली. हेडने 2024 मध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये 29 सामने खेळले आणि 42.39 च्या सरासरीने 1399 धावा केल्या. यादरम्यान त्याने 4 शतके आणि 5 अर्धशतके झळकावली. नाबाद 154 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज हेझलवूडला 158 मते मिळाली. तर कमिन्सला 147 आणि स्टीव्ह स्मिथला 105 मते मिळाली.
कॉन्स्टास ठरल ‘ब्रॅडमन यंग क्रिकेटर ऑफ द इयर’
भारताविरुद्ध 2024-25 च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या सॅम कॉन्स्टासला ‘ब्रॅडमन यंग क्रिकेटर ऑफ द इयर’ म्हणून निवडण्यात आले. त्याने मेलबर्नच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या पदार्पणाच्या कसोटीच्या पहिल्या डावात 60 धावा करून सर्वांना प्रभावित केले होते. उजव्या हाताच्या या युवा फलंदाजाने भारताविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या 4 डावात 113 धावा केल्या.
हेझलवुड आणि झाम्पा यांनाही पुरस्कार
हेझलवूडने गेल्या वर्षी कसोटीत 13.17 च्या सरासरीने 30 विकेट्स घेतल्या. त्याला ‘शेन वॉर्न टेस्ट प्लेअर ऑफ द इयर’ पुरस्कार मिळाला. लेग-स्पिनर अॅडम झम्पाला पुरुष टी-20 इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आले. त्याने 2024 मध्ये ऑस्ट्रेलियासाठी 21 टी-20 सामन्यांमध्ये 17.20 च्या सरासरीने सर्वाधिक 35 विकेट्स घेतल्या.