Published on
:
03 Feb 2025, 1:53 pm
Updated on
:
03 Feb 2025, 1:53 pm
नवी दिल्ली : अमेरिका दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निमंत्रणाबद्दल चर्चा झाली नाही. राहुल गांधी अमेरिका दौऱ्याबद्दल जाणूनबुजून खोटे बोलत आहेत, असा पलटवार परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी केला. यापूर्वी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परराष्ट्रमंत्र्यांच्या अमेरिका दौऱ्यावर आरोप केला. लोकसभेतील भाषणामध्ये ते म्हणाले की, परराष्ट्र मंत्र्यांना पंतप्रधानांच्या निमंत्रणासाठी तीन-चार वेळा अमेरिका दौऱ्यावर पाठवण्यात आले. त्यानंतर परराष्ट्रमंत्र्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करुन राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले आहे.
केंद्रीय मंत्री एस. जयशंकर म्हणाले की, पंतप्रधान मोदी शपथविधीसारख्या कार्यक्रमांना उपस्थित राहत नाहीत, हे सर्वज्ञात आहे. अशा कार्यक्रमांना भारताचे प्रतिनिधित्व सामान्यतः विशेष राजदूत करतात. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना भेटायला आणि कॉन्सल्स जनरलच्या बैठकीसाठी अमेरिका दौरा केल्याचे जयशंकर म्हणाले. राहुल गांधींचे खोटे बोलणे राजकीय हेतूने केले जाऊ शकते. अशा प्रकारच्या वक्तव्यांनी काँग्रेस नेते परदेशात देशाची प्रतिमा खराब करत असल्याचा आरोप मंत्री एस. जयशंकर यांनी केला.
दरम्यान, जर आपल्याकडे उत्पादन व्यवस्था असती आणि आपण तंत्रज्ञानावर काम करत असतो. तर आपण आपल्या पंतप्रधानांना अमेरिकेचे शपथविधीचे निमंत्रण मिळवण्यासाठी तीन-चार वेळा परराष्ट्र मंत्र्यांना पाठवले नसते. अमेरिकेच्या अध्यक्षांनी येथे येऊन पंतप्रधानांना आमंत्रित केले असते, असे गांधी म्हणाले.