चंद्रपूर : केव्हा केव्हा काळ फारच निष्ठुर बनतोय.एका आनंदी कुटुंबावर काळाने घाला घातला. दुचाकीने आजोबाच्या गावी जात असतांना एका कारचालकाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात लहान मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दुसरा मुलगा व आईवडिल गंभीररित्या जखमी झालेत. उपचारादरम्यान दुस-या मुलाचा मृत्यू झाल्याची वार्ता कुटुंबाना मिळाली अन आसवांचा पूर वाहू लागला. ही दुर्देवी व दु:खद घटना जिल्हातील गोंडपिपरी-धाबा मार्गावर चेकसोमनपल्लीजवळ आज सोमवारी घडली. या दुर्देवी घटनेमुळे घडोलीसह परिसरात शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर चौधरी (36) हे गोंडपिपरी तालुक्यातील घडोली येथील रहिवाशी आहेत. शेती करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शिवांनी चौधरी (30) हि त्यांची पत्नी असून धिरज चौधरी (5) व विरज चौधरी (2) अशी त्यांना दोन मुल होती. सुधीर चौधरी यांची सासुरवाडी ही गोंडपिपरी तालुक्यातील कुडेनांदगाव येथील आहे. धाबा येथे दरवर्षी यात्रा भरते. कुटुंबियांची भेटही होईल आणि मुलांना यात्राही दाखविता येईल या हेतूने आपल्या बाईकने घडोलीवरून कुडेनांदगावकडे निघाले होते. दरम्यान चेकसोमनपल्लीजवळ पोहचताच समोरून येणा-या कारने त्यांच्या बाईकला जबर धडक दिली. या भीषण अपघातात चौघेही खाली कोसळले. अपघाताची माहिती कळताच डॉ. किशोर पेंढारकर हे ॲम्बुलन्स घेऊन घटनास्थळी पोहचले. यावेळी केलेल्या तपासणीमध्ये चिमुकला विरज याचा जागीच मृत्यू झाला होता. गंभीर जखमी पडून असलेल्या तिघांनाही तातडीने उपचारासाठी चंद्रपूरला पाठविण्यात आले. वडील सुधीर चौधरी व आई शिवानी चौधरी हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांचे दोन्ही पाय तुटले असून डोक्यालाही गंभीर जखमा आहेत. चिमुकला मुलगा धिरज चौधरी हा गंभीर जखमी असल्याने त्याला नागपूरला हलविण्यात आले. परंतु उपचारासाठी नेत असातानाच त्याचाही मृत्यू झाला. आईवडिल बेशुध्द असल्याने त्यांना या प्रकाराची माहिती नाही.
ज्या कारने अपघात झाला ती कार किरमीरी येथील आश्रमशाळेतील शिक्षकाची होती. तो शिक्षक स्व:त वाहन चालवित होता, अशी माहिती आहे. अपघातात दोन सख्ख्या चिमुकल्या भावंडाचा मृत्यू झाल्याने आणि आईवडिल मृत्यूशी झुंज देत असल्याने घडोली गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.