Published on
:
03 Feb 2025, 4:53 pm
Updated on
:
03 Feb 2025, 4:53 pm
माजलगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेश सचिव श्रीहरी शिवाजीराव काळे(वय 47 वर्ष) यांचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जागीचमृत्यू झाला. ही घटना सोमवार दि 3 रोजी राष्ट्रीय महामार्गावर खरात आडगाव फाटा येथे रात्री 8 वाजता घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की,श्रीहरी काळे नातेवाईकाच्या लग्न कार्यक्रमास सकाळी मोटारसायकल वरून परभणीला गेली असल्याची माहिती आहे. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.भगवान सरवदे होते. संध्याकाळी लग्नकार्य उरकुन ते परभणी कडून माजलगावकडे राष्ट्रीय महामार्ग विशाखापट्टणम वरून येत होते.
माजलगाव शहरा नजीक असणाऱ्या खरात आडगाव फाटा येथे चहापाणी घेण्यासाठी त्यांनी रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान गाडी थांबवली.यावेळी त्यांच्या सोबत असणारे डॉ.सरवदे हे मोटार सायकलच्या एका बाजूने उतरले. तर दुसऱ्या बाजूने श्रीहरी काळे उतरत होते. याच दरम्यान भरधाव वेगात असणाऱ्या अज्ञात चार चाकी वाहनाने श्रीहरी काळे यांना जोराची धडक दिली. या धडकेत काळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या बाजूने मोटारसायकल वरून उतरणारे डॉ. सरवदे हे सुखरूप आहेत. दरम्यान अपघात करणारी गाडी पसार झाली असून श्रीहरी काळे यांचे शव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पुढील तपास माजलगाव ग्रामीण पोलीस करत आहेत.