घरातून बेपत्ता असलेल्या दोन तरुणींचे मृतदेह भाम धरणात आढळल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणी ३० जानेवारीपासून घरातून गायब झाल्या होत्या. त्यांच्या शोधासाठी त्यांच्या घरातील लोक पोलिस ठाण्याच्या चकरा मारीत होते. परंतू कोणतेही यश मिळत नव्हते, सर्व ठिकाणी शोधूनही घरातील तरुण मुली सापडत नसल्याने मुलींच्या आई-वडिलांना अन्न – पाणी सोडले होते. अचानक इगतपूरी येथील भाम धरणाच्या पाणी सोडण्याच्या आऊटलेट जवळ दोन तरुणींचे मृतदेहच आढळल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणींनी स्वत:ला संपवले की त्यांना कोणी ढकलले याचा शोध आता पोलिस घेत आहेत.
इगतपुरी तालुक्यातील कांचनगाव परिसरातील ठाकूरवाडी येथे भाम धरणाच्या पाणी सोडण्याच्या आऊटलेटमध्ये दोन बेपत्ता तरुणीचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. कांचनगांव परिसरातील ठाकुरवाडी येथील मनिषा भाऊ पारधी (वय १९ ) आणि सरीता काळु भगत ( वय १८ ) यांचे हे मृतदेह असल्याचे उघडकीस आले आहे. या मुली घरातून ३० जानेवारीपासून बेपत्ता झाल्या होत्या. या संदर्भात घोटी पोलीस ठाण्यात दि. ३० जानेवारी रोजी मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती.
आत्महत्या की घातपात
गेल्या पाच दिवसांपासून दोन तरुणी बेपत्ता झाल्याने त्यांची शोधाशोध सुरु होती. सोमवारी दुपारी या तरुणींचे मृतदेह गुरुदेव गोरख गिळंदे यांना धरणाच्या आऊटलेट येथे आढळले. त्यांनी याबाबत घोटी पोलिसांना माहिती दिली.त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर शेनवड बुद्रुकचे सरपंच कैलास लक्ष्मण कडू, रमेश शंकर गांगड,देविदास निवृत्ती केवारे, अंकुश संतू भगत, ज्ञानेश्वर काळू गिळंदे आणि मदन बिन्नर यांच्या मदतीने धरणाच्या पाण्यातून या तरुणीचे मृतदेह बाहेर काढले. या दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करण्यात आला आहे. आणि शवविच्छेदनासाठी घोटी ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहे. घोटी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या तरुणींनी आत्महत्या केली की त्यांच्याबाबत काही घातपात घडला याचा संशय कायम असून पोलिसांच्या तपासानंतर खरे चित्र स्पष्ट होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
हे सुद्धा वाचा