महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही मानाची कुस्ती स्पर्धा आहे. या स्पर्धेत चांदीची गदा पटकावण्यासाठी कुस्तीपटू वर्षानुवर्षे घाम गाळत असतात. मात्र यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला वादाची किनार लाभली. उपांत्य आणि अंतिम फेरीत जोरदार राडा झाला. उपांत्य फेरीत शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात सामना झाला. या सामन्यात पाठ टेकली नसल्याचं सांगत शिवराज राक्षेने पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेतला. दुसरीकडे, अंतिम फेरीतही तसंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत कुस्तीपटू महेंद्र गायकवाड याने सामना सोडला. त्यामुळे पृथ्वीराज मोहोळला विजेता म्हणून घोषित करण्यात आलं. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या 67 व्या कुस्तीची मानाची गदा पृथ्वीराज मोहोळला मिळाली. दुसरीकडे, शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांना पंचांशी वाद घातल्याने त्यांना तीन वर्षासाठी निलंबित करण्यात आलं. दरम्यान अंतिम सामना सोडण्याचं कारण काय? याबाबत कुस्तीप्रेमींमध्ये उत्सुकता होती. अखेर यावर कुस्तीपटू महेंद्र गायकवाड व्यक्त झाला आहे.
कुस्तीपटू महेंद्र गायकवाड याने आपली बाजू मांडताना सांगितलं की, ‘एकतर कुस्तीची शेवटची 35 सेकंद शिल्लक राहिली होती. त्यात पंचांनी मला वॉर्निंग वगैरे काही दिली नाही. थेट अॅक्टिव्हिटी पिरियड सुरु केला. 45 सेकंद असल्याशिवाय अॅक्टिव्हिडी पिरियड सुरु करता येत नाही. पण केला तर केला 16 सेकंद असताना मला सांगितलं गेलं की अॅक्टिव्हिटी पिरियडची 12 सेकंद सांगितलं गेली. मी फक्त विचारायला गेलो की, अॅक्टिव्हिटी पिरियड द्यायचा काय संबंध आहे. ते म्हणाले अॅक्टिव्हिटी पिरियड कुठे सुरु केला आहे आणि स्क्रिनवर 12 सेकंद दाखवत होते. ते म्हणाले तुला बाहेर ढकलेला प्वॉइंट आहे. पण स्क्रिनवर अॅक्टिव्हिटी पिरियड सुरु होता. हे तुम्ही लाईव्हला पाहू शकता.’
महेंद्र गायकवाड याने सांगितलं की, मी फक्त विचारायला गेलो होतो. तसेच शिवीगाळ केली नाही. ‘मी फक्त जाब विचारला आहे. एवढ्या दिवस आम्ही कष्ट करून काही अर्थ नाही. शेवट असं होत असेल तर काय? कुस्तीत राजकारण चालू आहे.’ असंही पुढे कुस्तीपटू महेंद्र गायकवाड याने सांगितलं. आम्ही सगळे मिळून अन्यायाविरुद्ध लढणार असल्याचंही देखील त्याने सांगितलं.