राज्यसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीमुळे अनेक भाविकांचा मृत्यू झाला, यावरून खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघती टीका केली. तसेच यावेळी खरगे यांनी पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या अकरा वचनांची आठवणही करून दिली.
- काळा पैसा- पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की काळा पैसा परत आणला तर प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये येतील पण असे झाले नाही.
- रोजगार – 2014 च्या निवडणुकीत भाजपने दरवर्षी दोन कोटी रोजगार देऊ असे वचन दिले होते, पण सध्या बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे.
- महागाई- मोदी सरकारने निवडणुकीपूर्वी पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी करू असे वचन दिले होते, पण आता पेट्रोल डिझेलच्या किंमती गगनला भिडल्या आहेत.
- गंगा नदीची सफाई – गंगा नदी पूर्णपणे साफ करण्याचे वचन मोदींनी दिले होते,पण गंगा तशीच्या तशीच असल्याचे खरगे यांनी म्हटले.
- पायाभूत सुविधा – देशभरातल्या पायाभूत सुविधांचे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करू असे वचन दिले होते, पण अनेक प्रकल्प अर्धवट आहेत.
- मेक इन इंडिया – मेक इन इंडियाच्या माध्यमातून 10 कोटी रोजगार देण्याचे वचन सरकारने दिले होते, पण ते पूर्ण झाले नाही.
- शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट – 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे वचन या सरकारने दिले होते, पण आता शेतकऱ्यांची अवस्था काय आहे हे सगळ्यांनाच माहित आहे.
- नोटबंदी – नोटबंदी झाल्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले होते की 50 दिवसांत स्थिती सुधारली नाही तर मला शिक्षा द्या, पण जनतेला याबाबत उत्तर मिळाले नाही.
- बुलेट ट्रेन – 2022 पर्यंत मुंबई-अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन सुरु करण्याचे वचन दिले होते ते अद्याप पूर्ण झालेले नाही.
- पीएम शेतकरी योजना – पीएम शेतकरी योजनेतून सरकार शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देणार होते, पण परिस्थिती वेगळीच आहे.
- फरार आर्थिक गुन्हेगार – नीरव मोदी, विजय माल्यांसारख्या लोकांना देशात परत आणणार होते, पण ते अजूनही देशात आले नाहीत.