Published on
:
03 Feb 2025, 11:32 am
Updated on
:
03 Feb 2025, 11:32 am
उमरगा: पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील कराळी येथील आगज्याप्पा देवस्थान गुरूकुलातील विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या गावगुंडा विरोधात गुन्हा दाखल होवून सात दिवस झाले. तरी आरोपींना अटक केली नाही. आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी सोमवारी (दि ०३) ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी संतप्त महिलांनी गुरू कुलातील विद्यार्थ्यांसह तहसील कार्यालयाच्या पायरीवर तब्बल एक तास ठिय्या मांडला होता. (Dharashiv Protest)
तहसीलदार गोविंद येरमे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, मागील आठवड्यात रात्री नऊच्या सुमारास आगज्याप्पा देवस्थानाच्या गुरुकुलातील आदित्य मंगेश वैष्णव व गौरव लक्ष्मण कदम या विद्यार्थ्यांना गावातीलच अमोल जमादार व नागराज जमादार यांनी तलवार, हंटरचा धाक दाखवून, गळा दाबून अमानुष मारहाण करून जीवे मारण्याचे धमकी दिली होती. याबाबत २८ जानेवारीला उमरगा पोलीस ठाण्यात विविध कलमाद्वारे गुन्हा नोंद झाला आहे. गुन्हा नोंद झाल्यापासून आरोपी अमोल व नागराज हे फरार आहेत. तर गुरुकुलातील विद्यार्थी तुरोरी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयात शिक्षणासाठी ये जा करत असताना अमोल याचा भाऊ सचिन जमादार व त्याचे नातेवाईक जीवे मारण्याची धमकी देत गुन्हा काढून घेण्यासाठी दबाव निर्माण करत आहेत. त्यामुळे गुरुकुलातील विद्यार्थी व ग्रामस्थांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. यावर पोलीसांनी कसल्याही प्रकारची कारवाई केली नाही.
यापूर्वी त्यांच्यावर पोलीसांत गुन्हे नोंद आहेत, असे असताना पोलीसांनी आरोपींना अद्याप अटक केली नाही. आरोपी खुलेआम फिरत असल्याने जीवाच्या भीतीपोटी विद्यार्थी शाळेत जायला तयार नाहीत. त्यामुळे आरोपींना तत्काळ अटक करावी, अन्यथा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर कराळी पाटी येथे १३ फेब्रुवारीपासून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. यावेळी गुरुकुलातील विद्यार्थी, तीनशेहून अधिक महिला व पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कराळी ग्रामस्थांनी तहसील कार्यालय त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी यांना मोर्चाद्वारे निवेदन दिले. यावेळी पोलीस उपअधीक्षक सदाशिव शेलार यांनी लवकर आरोपींना अटक करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर महिला व नागरिकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात आरोपींचा भाऊ तसेच नातेवाईकांवर कारवाईच्या मागणीसाठी तब्बल दोन तास ठिय्या मांडला, तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी महिला व नागरिकांची समजूत काढून आरोपींना लवकरच अटक करण्याचे आश्वासन दिले.