प्रचार अंतिम टप्प्यात, उमेदवारांचा मतदारांच्या प्रत्यक्ष गाठी-भेटीवर जोरfile photo
Published on
:
17 Nov 2024, 10:18 am
Updated on
:
17 Nov 2024, 10:18 am
जालना, पुढारी वृत्तसेवाः जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात निवडणुक प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला आहे. २० नोव्हेंबरला मतदान होणार असल्याने १८ नोव्हेंबरलाच प्रच प्राराच्या तोफा थंडावणार आहेत. प्रचारासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने सर्वच उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी सोशल मिडीयासह रॅली, सभा व कॉर्नर बैठकांचा धड़ाका उडवुन दिला आहे. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवार व त्यांचे कुटुंबीय फिरतांना दिसत आहेत.
जालना विधानसभा मतदारसंघात जालना, भोकरदन, बदनापुर, परतुर व घनसावंगी हे पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. पाच विधानसभा मतदारसंघात १०९ उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. त्यात परतुर ११, घनसावंगी २३, जालना २६, बदनापुर १७ तर भोकरदन सर्वाधिक ३२ उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. १६ लाख ५२ हजार ५११ मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत.
बंडखोर व अपक्षांच्या वाढलेल्या संख्येमुळे निवडणुक बुरशीची होणार असल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे यावेळी कोणत्याही पक्षाची लाट नसल्याचे वर वर दिसत असल्याने हवा कोणाची? हा प्रश्न बुचकळ्यात टाकणारा ठरत आहे.
जालना जिल्हा मराठा व ओबीसी आंदोलनाचे केंद्र असल्याने जिल्हयाच्या निवडणुकीवर या आंदोलनाचा काय परिणाम होणार? व कोण निवडुन येणार? याचे उत्तर निवडणुक निकालानंतर मिळणार आहे. निवडणुक प्रचाराच्या धुराळ्यात हेवे दावे व आरोप प्रत्यारोपात विकास प्रश्नांना दुय्यम स्थान मिळत असल्याचे दिसत आहे. अनेक मतदारसंघात बंडखोर उमेदवार निवडणुक रिंगणात असल्याने बंडखोर किती मते व कोणाची घेतात यावरच प्रमुख उमेदवारांच्या जय पराजयाचे गणित अवलंबुन राहणार असल्याचे दिसत आहे. प्रचाराला दोन दिवस उरले असल्याने उमेदवार व त्यांचे समर्थक दिवसाची रात्र करीत आहेत.
असे आहेत मतदार
१६ लाख ५२ हजार ५११ मतदारांपैकी पुरुष मतदार ८ लाख ६० हजार ३०३ तर स्त्री मतदार ७ लाख ९२ हजार १६६ एव्हढे आहेत. तृतीयपंथी मतदार ४२ असुन दिव्यांग मतदार १३ हजार ६५२ एव्हढे आहे. १८ ते १९ बयोगटातील नवमतदार ४१ हजार ५६ तर ८५ वर्षापुढील मतदार २७ हजार २८७ एवढे आहेत.