मतदारांचा विश्वास सार्थ ठरविणार : डॉ. मीनल खतगावकरpudhari photo
Published on
:
17 Nov 2024, 7:33 am
Updated on
:
17 Nov 2024, 7:33 am
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी राजकारणासोबतच समाजकारणही करण्याची शिकवण आपण अंगिकारलेली आहे. नायगाव विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करून मतदारांचा विश्वास सार्थ ठरविणार आहोत. त्यामुळे विधिमंडळात नायगावचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी मला मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन नायगाव विभागसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार डॉ. मीनल पाटील खतगावकर यांनी केले आहे.
नायगाव विधानसभा मतदारसंघातील नायगाव, धर्माबाद व उमरी तालुक्यात ठिकठिकाणी त्यांच्या प्रचार सभा पार पडल्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. उमरी तालुक्याती सभेत बोलताना डॉ. मीनल पाटील खतगावकर म्हणाल्या की भास्करराव पाटील खतगावकर यांच्या आमदार खासदारकीच्या काळात मतदारसंघात सिंचन, रोजगारासह अनेक प्रश्न मार्गी लागले. बारुळ धरणाची उंची वाढविण्यासाठी पाठपुरावा केला. मनार नदीवर टेंभुर्णी, सलगरा, मुगाव, टाकळी कोल्हापुरी बंधारे उभारून सिंचनाचा प्रश्न सोडविला.
गोदावरी नदीवर बाभळी आणि बळेगाव बंधाऱ्यासाठी प्रथम पाठपुरावा करण्यात आला. तसेच बोळसा, पिंपळगाव, चोळाखा येथील नवीन कोल्हापुरी बंधारे मंजुर करण्यासाठी पाठपुरावा केला. देगलूर-नायगाव रेल्वेमार्गासाठी संसदेत मागणी केली. निराधार, विधवा व वृध्द शेतमजुरांना पेन्शन मंजुर केले. ते निराधार आजही पेन्शनचा लाभ घेत आहेत. त्यांचे आशीर्वाद आजही खतगावकर परिवाराच्या पाठीशी आहेत, नायगाव विधानसभेच्या उमेदवार डॉ. मीनल पाटील खतगावकर म्हणाल्या.
भाजप आमदाराकडून जनतेचा विश्वासघात
विद्यमान आमदार राजेश पवार यांनी विकासकामे केली नाहीच, उलट गावपुढारी, सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, सोसायटी चेअरमन यांचा अपमानच केला. विकासकामांच्या नावाखाली टक्केवारी करून स्वतःचे खिसे भरले. त्यामुळे अशा विश्वासघात करणाऱ्या भाजपच्या आमदार राजेश पवार यांनी घरी बसवा आणि विकासाच्या माध्यमातून मतदारसंघाचा कायापालट करण्याचा ध्यास घेतलेल्या महाविकास आघाडीच्या काँग्रेस उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन महाविकास आघाडीच्या काँग्रेस उमेदवार डॉ. मीनल पाटील खतगावकर यांनी केले.