Published on
:
18 Nov 2024, 11:36 am
Updated on
:
18 Nov 2024, 11:36 am
औंढा नागनाथ, पुढारी वृत्तसेवा : आज प्रचाराचा शेवटचा दिवस कळमनुरी मतदार संघातील सर्वच उमेदवारांनी प्रत्यक्षात मतदारापर्यंत भेटी घेऊन मीच योग्य उमेदवार असल्याचे पटवून दिले असले तरी अद्यापही उमेदवारांना मतदारांच्या मनाचा कौल कळाला नसून मतदारांनी मात्र कोणत्या उमेदवाराला मतदान करायचे हे निश्चित ठरवले आहे.
कळमनुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये आजपर्यंत उमेदवाराला निवडून देण्यासाठी मतदान करणे ही सवय मतदारांची नसून कोणत्या उमेदवाराला पाडायचे यावरच अंतिम टप्प्यात मतदान केल्या जाते. या पाडापाडीच्या राजकारणामध्ये कोणत्या उमेदवाराचा बळी जातो हे सांगणे आज तरी शक्य दिसत नाही. यावेळी महायुतीकडून विद्यमान आमदार संतोष बांगर आपली सर्व शक्ती, साम दाम, दंड, भेद, निती अर्थ पणाला लावून प्रचार यंत्रणा राबवून आज आणि उद्या आपल्यालाच मतदार मतदान करतील या आत्मविश्वासाला ठाम असून त्यांच्या विरोधात महा विकास आघाडी कडून डॉ. संतोष टारफे मतदानाची जुळवा जुळव वेड्याचे सोंग घेऊन पेढे गावाला जाण्याच्या तयारीत आहेत.
आज सायंकाळी प्रचार यंत्रणा संपणार असून मतदारांच्या भेटीगाठी, कार्यकर्त्यांना खुश करणे आणि प्रत्येक गावातून आपल्यालाच सर्वाधिक कसे मतदान घेता येईल याकडे उमेदवार आपले वजन खर्ची घालित आहेत. मतदार संघामध्ये दुरंगी लढत होण्याचे अंतिम चित्र स्पष्ट असून तिसऱ्या नंबरसाठी वंचितकडून डॉ. दिलीप मस्के आणि अपक्ष शेतकरी मित्र अजित मगर यांच्यामध्ये लढत होत आहे. जातीपातीचे राजकारण करीत मतदार संघ ढवळून निघाला असला तरी प्रत्येक वेळी हटकर धनगर समाजाची मते निर्णायक मतदान करतात. परंतु यावेळी चित्र उलटे असून मराठा समाजाच्या मतावरच कळमनुरी बिधानसभा मतदारसंघाचा विधानसभा सदस्य ठरणार आहे मतदार संघामध्ये एक गठ्ठा मते कोणत्याच उमेदवाराच्या पाठीशी नसल्यामुळे मत विभाजनाचा फटका कोणत्या उमेदवारास कसा बसतो यावरून सुद्धा खूप काही समजणार आहे.
मराठा समाजाची मते आपल्याकडे वळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ प्रयत्न करीत आहेत. बहुतांशी मराठा समाज ज्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील तो उमेदवार निश्चितच विजयी होईल हे मात्र त्रिकाल सत्य आहे. कोणता उमेदवार आपल्याकडे ही मते मिळवू शकतो तो निश्चित विजयी होणार यात मात्र शंका बाळगण्याचे कारण नाही. २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होणार असून २३ तारखेला मतमोजणी होईल.
श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केल्याप्रमाणे हा सूर्य आणि हाच जयद्रथ असे मतदारांना व उमेदवारास पहावयास मिळणार असल्यामुळे मतमोजणी अंतीच मतदारांचा कौल कोणत्या उमेदवारांना समजणार आहे. प्रचार यंत्रणेमध्ये सर्व उमेदवारांनी आपापल्या परीने परिश्रमाची पराकाष्टा केली असली तरी उमेदवारांना अद्यापही मतदारांच्या मनातील समजू शकल्या नसल्यामुळे उमेदवार मात्र अद्यापही संभ्रमात आहेत.
मतदारांनी आपण कोणत्या उमेदवाराला मत द्यायचे हे पूर्वीच निश्चित केल्यामुळे निकालाअंतीच उमेदवारांना ही बाब समजणार आहे हे मात्र निश्चित. कोणाच्या नशिवामध्ये राजयोग आहे तोच उमेदवार विजय होईल हे निश्चितच मानावे लागेल.