अंतराळवीर सुनिता विल्यम्स गेल्या सहा महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये अडकली आहे. जूनमध्ये अवघ्या 10 दिवसांसाठी सुनीता अंतराळात गेली होती. पण अंतराळातील तांत्रिक बिघाडामुळे तिचं पृथ्वीवर येणं लांबलं. विशेष म्हणजे ज्या यानात बिघाड झाला होता, ते यान सुखरुप आलं आहे. पण सुनीता मात्र येऊ शकली नाही. यान सुखरुप पृथ्वीवर उतरेल याची काहीच शाश्वती नव्हती, त्यामुळे बिघडलेल्या यानातून सुनीता आणि तिच्या सहकाऱ्यांना आणण्याचं धाडस नासाने केलं नाही. त्यामुळे सुनीताचं आगमन रखडलं. सुनीताच्या तब्येतीबाबत आता एक मोठी अपडेट आली आहे. तिने अंतराळातून तिचा फोटो पाठवला आहे. त्यातून तिची प्रकृतीचा अंदाज येतो. या फोटोत सुनीता अंत्यत सडपातळ झालेली दिसत आहे. मात्र, तिची प्रकृती ठणठणीत असल्याने अफवांना लगाम बसला आहे.
सुनीता विल्यम्सचा हा नवीन फोटो अत्यंत रोचक असा आहे. स्पेस स्टेशनच्या खिडकीतून पृथ्वीला पाहतानाचा सुनीताचा हा फोटो आहे. हा फोटो अत्यंत चांगला आहे. सुनीताने किबो प्रयोगशाळा मॉड्युलमध्ये एस्ट्रोबी रोबोटिक फ्री फ्लायरची तपासणी केली. यावेळी तिने गेकोसारखे चिपकवता येणाऱ्या पॅडने सुसज्ज टेंटेकल सारखी रोबोटिक हँड इन्स्टॉल केली. या इन्स्टॉलेशनचा उद्देश सॅटेलाईट कॅप्चर तांत्रिक प्रदर्शन करणं हा होता. भविष्यातील अंतराळातील ही मोठी प्रगती मानली जाते.
मी पूर्णपणे ठिक आहे
सडपातळ दिसणं हे एक सामान्य शरीर परिवर्तन आहे. त्याला फ्लूइड शिफ्ट म्हटलं जातं, असं सुनीताने म्हटलं आहे. अंतराळात जाण्यापूर्वी जेवढं वजन होतं. तेवढंच आताही माझं वजन आहे. माझी प्रकृती चांगली आहे, असंही तिने म्हटलंय. नियमित व्यायामुळे प्रकृती चांगली असल्याचंही तिने स्पष्ट केलं आहे. ती अंतराळात रोज ट्रेडमिल, स्टेशनरी बाइकचा वापर करते. हाडे आणि मांसांमधील घनता कायम राहावी म्हणून ती काळजी घेत असते.
सातत्याने कामात बिझी
सुनीता विल्यम्स अंतराळात अडकली असली तरी ती सातत्याने काम करत आहे. सर्व्हिसिंग हटवण्यासाठी अंतराळातील वस्तूंना कसं कॅप्चर करायचं यावर सध्या इंजिनीअर काम करत आहेत. क्यूब आणि टोस्टरच्या आकाराचे असलेले एस्ट्रोबी रोबोट इंजिनीअरांद्वारे नियंत्रित केले जात आहे. त्यामुळे स्पेस स्टेशन वा दुसऱ्या सॅटेलाइटसोबत एखादं अन्य उपकरण जोडण्याच्या वा अंतराळातून मुक्त रुपाने उडणाऱ्या वस्तूंना कॅप्चर करण्यासाठी सुनिता विल्यम्सने लावलेल्या रोबोटिक हँडचा वापर केला जाणार आहे.
जूनपासून मुक्काम
सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी बूच विल्मोर गेल्या 5 जून रोजी अंतराळात परीक्षण मिशनवर आले होते. काही दिवसातच हे दोन्ही अंतराळवीर पृथ्वीवर येतील असं सांगितलं जात होतं. मात्र, त्यांचा मुक्काम वाढला आहे. आता 2025मध्ये हे दोघेही अंतराळातून येतील असं सांगितलं जात आहे. विल्मोर 61 वर्षाचे आहेत. तर सुनीता 58 वर्षाची आहे. दोघेही बोइंग स्टारलाइनर अंतराळ यानातून स्पेस स्टेशनवर आले होते.