निवडणूक मतदान निमित्ताने संपूर्ण यंत्रणा सज्ज
हिंगोली (Hingoli Assembly Elections) : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबरला होणार आहे. त्या निमित्ताने जिल्ह्यातील १०२३ पैकी ५१२ मतदान केंद्रावर वेब कॉस्टींग केले जाणार आहे. या माध्यमयातून मतदान केंद्रावरील प्रत्येक हालचाली जिल्हाधिकारी कार्यालयात बसून पाहता येणार आहे.
विधानसभा निवडणुकीचे (Hingoli Assembly Elections) मतदान मतदारांनी भयभुक्त वातावरणात करावे यासाठी निवडणूक विभागातर्फे आवाहन करण्यात आले आहे. निवडणुकीच्या खुल्या प्रचाराची सांगता १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता झाली. त्या निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक आदित्य पवार, जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, निवडणूक उपजिल्हाधिकारी रामेश्वर रोडगे यांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी बोलताना सांगितले की, २० नोव्हेंबरच्या मतदानाच्या अनुषंगाने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी १९ नोव्हेंबर मंगळवार रोजी प्रत्येक मतदार संघ निहाय मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचार्यांना रवाना करण्यात येणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने एकूण १०२३ मतदान केंद्र आहेत. ज्यामध्ये शहरी भागात १६० तर ग्रामीण भागात २८६ मतदान केंद्र आहेत. ज्यामध्ये ५१२ मतदान केंद्रावर वेब कॉस्टींग केली जाणार आहे. त्यासाठी सनियंत्रण कक्ष तयार करण्यात आला असून या मतदान केंद्रावरील हालचाली जिल्हाधिकारी बसून पाहता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणूक (Hingoli Assembly Elections) निमित्ताने वसमत तालुक्यात किन्होळा हे मतदान केंद्र संवेदनशिल आहे. यासोबतच अन्य ठिकाणीही पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
६५ तक्रारी प्राप्त
निवडणूक दरम्यान एकूण ६५ तक्रारी प्राप्त झाल्या. ज्यामध्ये वसमत ५१, हिंगोली ११, कळमनुरी मतदार संघात ३ तक्रारी प्राप्त झाल्या असता तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करून निकाली काढण्यात आल्या.
११ गुन्हे दाखल
आदर्श आचार संहिता भंगाबाबत एकूण ११ गुन्हे दाखल आहेत. ज्यामध्ये कळमनुरी ठाणे हद्दीत ८, सेनगाव ठाणे हद्दीत ३ गुन्ह्याची नोंद झाली आहे.