Published on
:
15 Nov 2024, 12:23 pm
Updated on
:
15 Nov 2024, 12:23 pm
नांदेड, पुढारी वृत्तसेवा: राजकारणात येऊन फार दिवस झाले नाहीत. प्रत्यक्ष निवडणूक लढविण्याची तर पहिलीच वेळ. या अल्प कालावधीमध्ये मुंबईच्या कॉन्व्हेंट शाळेत शिकलेल्या श्रीजया अशोक चव्हाण यांनी अतिशय परिश्रमपूर्वक विविध विषयांचा अभ्यास करून त्याची योग्य मांडणी कशी करावी याचा वस्तूपाठ घालून दिला. बुधवारी (दि.१३) मालेगाव येथे झालेल्या सभेत श्रीजयाने शिक्षणापासून रोजगारापर्यंत सर्व मुद्यांना व्यवस्थित स्पर्श करून आपली आगामी काळातील वाटचाल कशी असेल याच्या जणू पाऊल खुणा दाखवून दिल्या.
श्रीजयाच्या अभ्यासपूर्ण भाषणाने खुद्द ज्योतिरादित्य शिंदे सुद्धा प्रभावित झाल्याचे जाणवले बुधवारी मालेगाव येथे महायुतीच्या प्रचारार्थ जंगी सभा झाली. यावेळी अशोक चव्हाण, अमिताभाभी, उपस्थित होते. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाषणाने ही सभा गाजलीच परंतु तत्पूर्वी भोकर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार भाजपच्या श्रीजया चव्हाण यांच्या भाषणाने विशेष लक्ष वेधून घेतले.
श्रीजया चव्हाण यांना राजकारणात येऊन फार दिवस झाले नाहीत. जेमतेम दोन वर्ष त्या सार्वजनिक व्यासपीठावर दिसू लागल्या. वास्तविक यापूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीतही त्यांनी एक बाजू सांभाळून घेतली होती; परंतु त्यात त्यांचा म्हणावा तसा सहभाग नव्हता. हळूहळू त्यांनी स्वतः मधील नेतृत्व गुण विकसित केले. त्यांच्या बोलण्यावरून आणि एकंदर राजकारणातील वावरावरून त्यांच्यावर राजकारण जबरदस्तीने थोपवले गेले असे वाटत नाही. त्यांनी अतिशय परिश्रमपूर्वक भोकर मतदारसंघ पिंजून काढला आहे.
या भागातील छोट्या मोठ्या समस्यांची त्यांना जाण असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून दिसून येते त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच आपल्या आगामी वाटचालीत कोणत्या विषयांना प्राधान्य असेल याचा नामोल्लेख केला त्यात त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दर्जाच्या सुधारणाबाबत जो मुद्दा मांडला तो अतिशय लक्षवेधी आणि प्रभावी ठरला. आता जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारणे काळजी गरज आहे. नांदेड सारख्या मोठ्या जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळा वरचेवर आक्रसत चालल्या आहेत. त्यांची संख्या विद्यार्थी संख्या अभावी कमी होत चालली आहे; परंतु उगवत्या नेतृत्वाने या मुद्याला स्पर्श करणे हे आश्वासक लक्षण दिसून येते.
याशिवाय कृषी क्षेत्राच्या बाबतीमध्ये सुद्धा श्रीजया चव्हाण यांनी जो मुद्दा मांडला तो पण प्रभावी आहे. कमीत कमी जागेत अर्थात कमीत कमी शेतीत जास्तीत जास्त उत्पन्न कसे घ्यावे यासाठी कृषी विभागातील तज्ञांची मदत घेऊन शेतकऱ्यांचे मेळावे घेण्याचा त्यांचा मानस आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. याशिवाय 'युवा उमेद' असा एक मंच त्यांनी स्थापन केला असून या माध्यमातून सोशल मीडियाच्या आधारे युवकांना प्रशिक्षित करणे. त्यांना ज्या विविध स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत, त्या स्पर्धा परीक्षाबद्दल मार्गदर्शन करणे, असा एक व्यापक कार्यक्रम घेण्याची त्यांची योजना असून ती अधिक फलदायी झाली पाहिजे यासाठी त्यांच्याकडे युवकांची एक टीम देखील असणे आवश्यक आहे. तशी टीम त्यांनी गोळाही केली आहे.
सर्वसामान्यांची जिंकली मने
श्रीजया चव्हाण आपल्या भाषणामध्ये विविध मुद्यांना स्पर्श करत होत्या, त्यावेळी ज्योतिरादित्य शिंदे त्यांच्या भाषणाने प्रभावित झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. अर्थात श्रीजया यांचे शिक्षण कॉन्व्हेंट शाळेत झाले आहे. उच्च शिक्षण देखील इंग्रजी माध्यमात झालेले असल्यामुळे त्यांच्या बोलण्यात तशी लकब जाणवत होती. आपणही भूमिपुत्र असून मालेगाव येथे आपली शेती असल्याचे त्यांनी ठासून सांगितले; परंतु विकासासाठी हा मुद्दा काही क्वालिफिकेशन होऊ शकत नाही, असा त्यांचा मुद्दा हा सर्वसामान्यांना सहज पटणारा आहे.