नृसिंहवाडीत दक्षिण उत्तर घाटावर भाविकांनी हजारो दिवे प्रज्वलित केले.
Published on
:
15 Nov 2024, 2:32 pm
Updated on
:
15 Nov 2024, 2:32 pm
नृसिंहवाडी : नृसिंहवाडी येथील प्रसिद्ध दत्त मंदिराच्या घाटावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त असंख्य भाविकांनी कृष्णा-पंचगंगा संगमावर पवित्र कार्तिक स्नान करून श्री दत्तांचे दर्शन घेतले. दक्षिण उत्तर घाटावर भाविकांनी हजारो दिवे प्रज्वलित केल्याने इथला परिसर फुलून गेला होता.
गुरुनानक जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी आल्यामुळे भाविकांनी स्नान व दर्शनासाठी नृसिंहवाडीत मोठी गर्दी केली होती. असंख्य महिलांनी श्रद्धेने कृष्णा नदीत दिवे अर्पण केले. त्रिपुरारी कार्तिक पौर्णिमेनिमित्त पहाटे पाच वाजता काकड आरती प्रातःकालीन पूजा सकाळी आठ ते बारा या वेळेत भाविकांचे पंचामृत अभिषेक दुपारी साडेबारा वाजता श्रींच्या मुख्य चरण कमलांची महापूजा दुपारी तीन ते चार वाजता पवमान पंचसूक्त पठण रात्री आठनंतर धूप दीप आरती श्रींचा पालखी सोहळा आदि नित्य कार्यक्रम पार पडले.
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दक्षिण उत्तर घाटावर भाविकांनी शेकडो दिवे प्रज्वलित केल्यामुळे येथील दृश्य विलोभनीय दिसत होते. कार्तिक पौर्णिमेनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन दत्त देवस्थानमार्फत दर्शन मार्गावर रांगा लावण्यात आल्या होत्या. तसेच येथील भैरवट जेरे प्रसादालय येथे महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. देवस्थानचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी, चिटणीस संजय पुजारी, सर्व विश्वस्त कर्मचारी यांनी गर्दीचे नियोजन केले. ग्रामपंचायत मार्फत सरपंच चित्रा रमेश सुतार, उपसरपंच रमेश मोरे, ज्येष्ठ सदस्य धनाजीराव जगदाळे, ग्रामविकास अधिकारी एस बी चव्हाण, गर्दीच्या व्यवस्थेचे नियोजन पहात होते. येथील बहुमजली पार्किंग वाहनांच्या गर्दीमुळे हाउसफुल झाले होते.