Published on
:
15 Nov 2024, 3:48 pm
Updated on
:
15 Nov 2024, 3:48 pm
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिके अंतर्गत स्मार्ट सिटी विभागामार्फत सुरू असलेल्या प्रकल्पांना जपान देशाच्या प्रतिनिधींनी भेट दिली.
कल्याण - डोंबिवलीत स्मार्ट कल्याण-डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत हाती घेण्यात आलेल्या माहिती तंत्रज्ञान आणि क्षेत्र विकास आधारीत प्रकल्पांबाबत केंद्र शासनासोबत झालेल्या करारानुसार जपान-इंडिया स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन प्लॅटफॉर्म (JISCOP) अंतर्गत जपान सरकारच्या जमीन, मुलभूत सुविधा, वाहतूक आणि पर्यटन मंत्रालयाच्या प्रतिनिधी कोशीगाशी काना मिझुकी ओसावा यांनी भेट दिली. यावेळी जपानच्या प्रतिनिधींनी स्मार्ट सिटी प्रकल्पांचे कौतुक केले.
या प्रतिनिधींसोबत नोमुरा रिसर्च इन्स्टिट्यूट कन्सल्टिंग अँड सोल्युशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रतिनिधी अय्या होंडा आणि वर्षा गुप्ते या अधिकारी देखिल उपस्थित होत्या. या निमित्ताने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला स्मार्ट कल्याण-डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत केलेल्या पॅन सिटी (Information Technology Projects) आणि Area Based Development Projects (ABD) स्थापत्य प्रकल्पांतर्गत करण्यात आलेल्या कामांचे सादरीकरण करण्यात आले.
पॅन सिटी प्रकल्पाचे सादरीकरण झाल्यानंतर जपान सरकारच्या प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत काही उपस्थित केलेल्या मुद्यांवरील चर्चेत महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड, एसकेडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महाव्यवस्थापक (माहिती व तंत्रज्ञान) यांनी सहभाग घेऊन सर्वंकष माहिती दिली. त्यानंतर क्षेत्र विकास आधारीत प्रकल्पांबाबतची सद्य:स्थितीदर्शक माहितीचे प्रतिनिधी मंडळाला स्मार्ट सिटीचे उपअभियंता व संमंत्रकांनी सादरीकरण केले. जपानच्या प्रतिनिधींनी स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित केलेल्या गौरीपाड्यातील सिटीपार्क आणि दुर्गाडी येथील रिव्हरफ्रंट अंतर्गत भारतीय नौसेनेने कल्याण-डोंबिवलीसाठी दिलेल्या टी - 80 फास्ट अटॅक शिप ठेवण्यात आलेल्या प्रकल्पाची पाहणी केली.
या प्रकल्पाच्या पाहणीनंतर प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले. जपान सरकारच्यावतीने प्रतिनिधींनी दिलेल्या भेटी वेळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड, स्मार्ट कल्याण-डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद रोडे, केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे महाव्यवस्थापक प्रशांत भगत, उपअभियंता संदीप तांबे तसेच संमंत्रक उपस्थित होते.