चुलीत गेले दारू-मटण, मी दाबेल ईव्हीएमचे बटण!:अमरावतीच्या ग्रामीण भागात पथनाट्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
2 hours ago
1
अमरावती तालुका स्विप कक्षाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या 'चुलीत गेली दारू अन् चुलीत गेलं मटण, मी दाबेल निवडणुकीत मतदानाचं बटण' या पथनाट्याने ग्रामीण भागात धमाल उडविली आहे. दरम्यान हे पथनाट्य पाहण्यासाठी ग्रामीण भागात चांगलीच गर्दी उसळत आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्विप कक्षा अंतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात असून अमरावती तालुक्याच्या चमूने हे पथनाट्य तयार केले आहे. "चुलीत गेली दारू अन चुलीत गेलं मटण, मी दाबेल निवडणुकीत मतदानाचं बटण" हे मुळात ग्रामीण भागातील वऱ्हाडी भाषेतील वाक्य आहे. शिवाय हा संवाद अनेकांच्या परिचयाचा असल्याने तो ऐकण्यासाठी व सादर करतानाचे हावभाव पाहण्यासाठी अनेक जण गर्दी करीत आहेत. सध्या या पथनाट्याने गावागावातील चौका-चौकात धमाल उडविली आहे. स्वीपप कक्षाच्या नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र, शिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदार संघात हे पथनाट्या सादर केले जात आहे. अमरावती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे, तालुका नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी धनंजय वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदार जनजागृती संदर्भात रेवसा, कठोरा व नया अकोला येथे या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. पथनाट्यादरम्यान मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो अशा घोषणा देऊन उपस्थित नागरिकांना मतदानाची शपथ देण्यात आली. यावेळी अनेक महिला व पुरुष, वृध्द मतदार उपस्थित होते. हे आहेत त्यातील कलावंत शिक्षण विस्तार अधिकारी सुधीर खोडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात वैशाली वऱ्हाडे, नलिनी गोरे, कविता उघडे, अश्विनी पोकळे, सारीका काळे, संगीता रूपनारायण, सचिन वानखडे यांनी पथनाट्याचे उत्कृष्ट सादरीकरण केले. पथनाट्यातील कलाकारांचे एकसारखे पोशाख सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)