Published on
:
15 Nov 2024, 7:49 pm
Updated on
:
15 Nov 2024, 7:49 pm
झाशी : झाशी मेडिकल कॉलेजच्या इन्फंट वॉर्डमध्ये शुक्रवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत आतापर्यंत १० मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बचावकार्य सुरू असून आत्तापर्यंत ३० जणांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आले आहे.
३१ नवजात बालकांना बाहेर काढण्यात आले
शुक्रवारी रात्री उशिरा महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवजात अतिदक्षता विभागातील एसएनसीयू वॉर्डमध्ये भीषण आग लागून त्यात १० नवजात बालकांचा मृत्यू झाला. ज्या वॉर्डात आग लागली तेथे ४७ नवजात बालके दाखल केली होती. वॉर्डमधून ३१ नवजात बालकांना बाहेर काढण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दल आणि लष्कराच्या गाड्या आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. दहा नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने रुग्णालय परिसरात गोंधळाचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री पावणे अकराच्या सुमारास एसएनसीयू वॉर्डमधून धूर निघताना दिसला. यावेळी उपस्थित लोकांनी आरडाओरडा केला. कोणाला काही समजण्याआधीच आगीच्या ज्वाळांना सुरुवात झाली. काही वेळातच आगीने वॉर्डाला वेढले. नवजात बालकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र दारात धूर आणि ज्वाळांमुळे नवजात बालकांना बाहेर काढण्यास व्यत्यय येत होता. अग्निशमन दलाच्या गाड्या आल्यावर नवजात बालकांना बाहेर काढण्यात आले. आतापर्यंत १० नवजात बालकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. घटनास्थळी बचावकार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
मुख्यमंत्री योगी यांनी घेतली घटनेची दखल
या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री योगी यांनी उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांना झाशीला पाठवले आहे. त्यांचे सहा मुख्य आरोग्य सचिवही झाशीला येत आहेत. मुख्यमंत्री योगींनी १२ तासांत घटनेचा तपास अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या अपघाताची चौकशी आयुक्त आणि डीआयजी करत आहेत. चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.