Sanju Samson : 9 षटकार 6 चौकार, संजूची विंध्वसक खेळी, तिसऱ्या शतकासह वर्ल्ड रेकॉर्ड, आणखी काय केलं?
जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या आणि अंतिम टी 20i सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांची धमाकेदार बॅटिंग पाहायला मिळाली. संजू सॅमसन याने शतकी खेळीसह साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. संजूला टी 20i क्रिकेटमध्ये सलग 2 शतकानंतर या मालिकेतील गेल्या 2 सामन्यांमध्ये भोपळाही फोडता आला नव्हता. मात्र त्याने आता या चौथ्या समन्यात पुन्हा एकदा शतक ठोकलं. संजूने नाबाद 109 धावांची खेळी केली. संजूने या शतकी खेळीसह टीम इंडियाला 20 ओव्हरमध्ये 283 धावांपर्यंत पोहचवण्यात योगदान दिलं. संजूने या शतकासह वर्ल्ड रेकॉर्ड केला तसेच अनेक विक्रमही रचले.
संजूचा वर्ल्ड रेकॉर्ड
संजूने 51 बॉलमध्ये 8 सिक्स आणि 6 फोरसह 196.08 च्या स्ट्राईक रेटने हे शतक पूर्ण केलं. संजूच्या टी 20i कारकीर्दीतील हे एकूण आणि गेल्या काही दिवसातील तिसरं शतक ठरलं. संजूने या तिसऱ्या शतकासह वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. संजू एकाच वर्षात सर्वाधिक 3 शतकं करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
संजूची 3 शतकं
संजूने बांगलादेशविरुद्धच्या तिसर्या आणि अंतिम टी 20i सामन्यात शतक ठोकलं होतं. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलामीच्या सामन्यात शेकडा पूर्ण केला. संजूला त्यानंतर पुढील दोन्ही सामन्यात खातंही उघडता आलं नाही. मात्र आता चौथ्या सामन्यात त्याने शतक झळकावलं.
संजूने 12 ऑक्टोबरला बांगलादेशविरुद्ध तिसऱ्या आणि अंतिम टी 20i सामन्यात हैदराबाद येथे 40 बॉलमध्ये सेंच्युरी पूर्ण केली. संजूने तेव्हा 47 बॉलमध्ये 111 धावा केल्या. संजूने त्यानंतर 8 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलामीच्या सामन्यात 47 बॉलमध्ये डर्बनमध्ये शतक ठोकलं. संजू यासह एकाच वर्षात 2 शतकं करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. संजू डर्बनमध्ये 50 बॉलमध्ये 107 रन्स करुन आऊट झाला.
सलग 2 बदकं
संजूला त्यानंतर मात्र या मालिकेत दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात काहीच करता आलं नाही. संजू आला तसाच गेला. मात्र त्याने चौथ्या सामन्यात शतक करत अनेक रेकॉर्ड्स उद्धवस्त केले. संजूने या चौथ्या सामन्यात 9 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 194.64 च्या स्ट्राईक रेटने या 109 धावा केल्या.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: एडन मार्करम (कॅप्टन), रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को यान्सेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज आणि लुथो सिपामला.