लहान मुलांमधील वाढते मधुमेहाचे प्रमाण चिंताजनक:मुलांना पूर्वीपासून चालत आलेले आहारसंस्कार देणे गरजेचे - मेधा कुलकर्णी

2 hours ago 1
आज आई वडील दोघेही करियर व कामात व्यस्त असताना घरातील लहान मुलांना गुणवत्तापूर्ण वेळ, इतर संस्कार यांसोबतच आपल्याकडे पूर्वीपासून चालत आलेले आहार विषयक संस्कार देणेही गरजेचे असल्याचे मत खासदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. गेल्या काही वर्षांत लहान मुलांमध्ये वाढते मधुमेहाचे प्रमाण हे चिंताजनक असल्याचेही त्या म्हणाल्या. दोन्ही पालक करिअरमध्ये व्यस्त असताना घरातील लहान मुलांकडे होणारे दुर्लक्ष, व्हिडिओ गेम्स व आभासी दुनियेत रमणारी मुले, शिस्त लावणाऱ्या व वेळ प्रसंगी लाड करणाऱ्या आजी आजोबांचा कमी झालेला सहवास, जीवनशैलीत झालेले अनन्यसाधारण बदल यामुळे गेल्या काही वर्षांत लहान मुलांमधील मधुमेहाचे प्रमाण हे वाढत असून या प्रश्नावर भाष्य करणाऱ्या आणि या वाढत्या समस्येविषयी जनजागृती करणाऱ्या राहुल पणशीकर दिग्दर्शित ‘अभिलाषा’ या लघुपटाचा शुभारंभाचा प्रयोग आज विधी महाविद्यालय रस्त्यावरील एनएफएआय येथे संपन्न झाला. त्यावेळी मेधा कुलकर्णी बोलत होत्या. ‘राहुलस् ग्राफिक्स’ या संस्थेच्या वतीने या लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे. फ्लिटगार्ड फिल्टर्सचे अध्यक्ष संजय कुलकर्णी, फिटर या फिटनेस व न्यूट्रिशन या क्षेत्रात नावलौकिक असलेल्या संस्थेचे संस्थापक बाला कृष्ण रेड्डी, लघुपटाच्या संगीत दिग्दर्शिका अपर्णा पणशीकर, मधुमेह तज्ज्ञ डॉ आश्विनी जोशी यावेळी उपस्थित होते. आज शाळेमध्ये मुलांना शिस्त लावली तर शिक्षकांना दोषी धरल्या जाते. घरामध्ये आपणच मुलांना मुभा देत असतो. आधी आजी आजोबा मुलांचे लाड करायचे तसे शिस्तही लावायचे पण आता आजी आजोबा हा ‘फॅक्टर’च आपल्या आयुष्यातून कमी झाला आहे. अशा परिस्थितीत आयुष्याचे गांभीर्य ओळखून लहान मुलांमध्ये होणाऱ्या मधुमेहाविषयी 'अभिलाषा' हा लघुपट पालकांना एक दृष्टीकोन देऊन जातो, असे कुलकर्णी म्हणाल्या. एकीकडे आपली जीवनपद्धती ही आज पूर्वीसारखी राहिली नाही. तर दुसरीकडे आपल्या सर्वांच्याच आयुष्यामधून शिस्त निघून गेली आहे. अशा परिस्थितीत सामाजिक विषया लहान मुलांमधील मधुमेहाविषयी जनजागृती करायची असेल तर चिरकाल टिकणारे असे दृकश्राव्य माध्यम गरजेचे आहे असेही त्यांनी नमूद केले. जगात भारताला मधुमेहाची राजधानी म्हणून संबोधले जात असताना आयसीएमआरच्या आकडेवारीप्रमाणे आज भारतातील ११.४ टक्के म्हणजेच १०.१ कोटी नागरिक हे मधुमेहाने ग्रस्त आहेत. २०४५ पर्यंत हा आकडा १२.४ कोटी इतका वाढेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. दुसरीकडे ५३.१% नागरिकांना मधुमेह होण्याची शक्यता असून २०२१ या एका वर्षांत मधुमेहामुळे तब्बल ६ लाख ४८ हजार नागरीकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मधुमेहापासून दूर रहायचे असेल तर कुटुंब स्तरावर काम करणे गरजेचे असल्याचे मत रेड्डी यांनी मांडले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article