छत्रपती संभाजीनगर: काँग्रेस पूर्वीपासूनच आरक्षणाच्या विरोधी आहे. आरक्षणमुक्त देश हेच त्यांचे धोरण आहे. त्यामुळेच ओबीसीतील जातीजातींमध्ये भांडणे लावण्याचे काम हे करीत आहेत. राज्यात सता आल्यावर ते एससी-एसटी आणि ओबीसीचे आरक्षण संपविणार, हाच त्यांचा अजेंडा आहे. असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. १४) छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित विजय निर्धार सभेत केला, काँग्रेससह महाविकास आघाडीच्या धोरणांवर त्यांनी हल्लाबोल केला.
पंतप्रधान मोदी महणाले, राज्याला मराठवाड्याने तीन मुख्यमंत्री दिले. अनेक वर्ष काँग्रेसची सत्ता राहिली. परंतु, त्यांनी कभी मराठवाडयाचा दुष्काळ दूरः करण्यासाठी काही प्रयत्न केला का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महायुतीच्या सत्तेत मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी बॉटर ग्रीड, जलयुक्त शिवारसारख्या योजना राबवून मराठवाडयातून दुष्काळ दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अडीच वर्षे महाविकास आघाडीची सत्ता होती, त्यांनी सर्व योजना बंद केल्या. त्यामुळे या सत्तेत दूर करून महायुतीची सत्ता आणली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंद योजना पुन्हा सुरु केल्या. सोयाबीनला प्रतिक्किंटल ६ हजार रुपयांचा दर देण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांसाठी खीर पंप योजना, लाडकी बहीण योजना या सुविधा दिल्या. काँग्रेसवाल्यांचा विकासावर नव्हे तर भेद निर्माण करण्यावरच विश्वास आहे. त्यांचा खरा चेहरा वृत्तपत्रातील जाहिरातीतूनच पाहता येईल. आरक्षण देशविरोधी असल्याचे ते जाहीरपणे म्हणतात, त्यामुळेना सत्ता आल्यावर ते राज्यातील एससी, एसटी आणि ओबीसीचे आरक्षण संपवतील, असा आरोप मोदी यांनी केला.
कॉंग्रेसवाल्यांना ओबीसी पंतप्रधान नकोय
काँग्रेसवाल्यांना ओबीसीचा पंतप्रधान त्यांना सहन होईना. त्यामुळेच कॉंग्रेसच्या शहजादे यांनी सर्व पक्षांना एकत्र करून पंतप्रधान बदलासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र, जनतेने त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडले, अशा शब्दात त्यांनी राहुल गांधी यांच्यावर नाव न घेतला टीका केली.
३७० कलम बदलण्याचा घाट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर आज देश सुरक्षित आहे. संपूर्ण देश या संविधानानुसारच चालत आहे. परंतु, कॉंग्रेसवाल्यांना ते सहन होत नसल्यामुळे त्यांनी काश्मीरमधून कलम ३७० हटविण्याचा घाट घातला आहे. तसेच काश्मीरसाठी दुसरे संविधान तयार करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचा आरोप करून काँग्रेसवाले पाकिस्तानची भाषा बोलत आहेत, त्यामुळे त्यांना धडा शिकवा, असे आवाहनदेखील त्यांनी केले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा निवडणूक प्रमुख रावसाहेब दानवे, खासदार डॉ. भागवत कराड, खासदार संदीपान भुमरे, गृहनिर्माणमंत्री तथा पूर्वचे उमेदवार अतुल सावे, सिडकोचे अध्यक्ष तथा पश्चिमचे उमेदवार संजय शिरसाट, फुलंब्रीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण, पैठणचे उमदेवार विलास भुमरे, बदनापूरचे उमेदवार नारायण कुचे, भोकरदनचे उमेदवार संतोष दानवे, कन्नडच्या उमेदवार संजना जाधव, अर्जुन खोतकर यांच्यासह भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, ग्रामीणचे संजय खंबायते, सुहास शिरसाठ यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.