निवडणुकीच्या निकालाबाबत सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी माझाच नेता निवडून येईल, अशा पैजा लावल्या आहेत.File Photo
Published on
:
22 Nov 2024, 12:17 am
Updated on
:
22 Nov 2024, 12:17 am
सांगोला : सांगोला विधानसभा मतदारसंघासाठीच्या पंचवार्षिक निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आ. शहाजी पाटील, महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार दीपक साळुंखे -पाटील, शेकापचे उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यात अटीतटीची चुरशीची तिरंगी लढत झाली. सरासरी 78.14 टक्के मतदान झाले आहे. या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्याने सर्वच राजकीय नेत्यांची धाकधूक वाढली आहे. या निवडणुकीत खरे चित्र हे कोणत्या उमेदवाराला किती मतदान पडते, यावर अवलंबून आहे. निवडणुकीच्या निकालाबाबत सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी माझाच नेता निवडून येईल, अशा पैजा लावल्या आहेत.
सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांची प्रतिष्ठेची, तर माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांना भवितव्य घडविणारी, तर शेकापच्या डॉ. बाबासाहेब देशमुख यांना आपला गड शाबूत ठेवण्याची कसोटी पाहावयास मिळाली. मतदारांनी रात्री साडेदहा वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावून सर्वच पक्षांची धाकधूक वाढवली आहे. या मतदानासाठी महिलांनीही मोठा प्रतिसाद दिला आहे.
या निवडणुकीत ‘लाडकी बहीण’, पिण्याचे व शेतीचे पाणी, विविध विकासकामे तसेच वाढलेली बेरोजगारीच्या समस्या, चार एमआयडीसी उभारणार, मूलभूत गरजा यासाठी प्रयत्न होणार, शासकीय अधिकार्यांवर अंकुश हे विषय प्रामुख्याने हाताळले गेले. त्याचबरोबर एकमेकांवर गरळही ओकली गेली; पण या मतदारसंघात खरी लढत मराठा विरुद्ध धनगर अशी झाली. यामध्ये मराठा समाजाचे दोन उमेदवार होते, तर धनगर समाजाचा एक उमेदवार होता. मराठा व धनगर समाज सोडून इतर अल्पसंख्याक समाज हा ज्याच्या बाजूने जाईल त्याचा विजय निश्चित होईल, असे बोलले जात आहे. त्यातच या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाणही झाली आहे.
मतदानाचा वाढता टक्का चिंताजनक
चुरशीच्या लढाईत कोण निवडून येईल हे सांगता येत नसले तरी सर्वच उमेदवार यांच्या कार्यकर्त्यांनी माझाच नेता निवडून येईल, अशा पैजा लावल्या आहेत. बुथनिहाय आकडेवारी काढली जात असून, चौकाचौकांत माझाच नेता निवडून येईल, असे ठामपणे सांगितले जात आहे; पण मतदारराजाने वाढवलेली मतदानाची टक्केवारी सर्वच नेते व कार्यकर्त्यांना विचार करायला लावणारी आहे.