Published on
:
22 Nov 2024, 5:54 am
Updated on
:
22 Nov 2024, 5:54 am
पैठण : पुढारी वृत्तसेवा
पैठण तालुका विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी बुधवारी मतदान पार पडले. याची मतमोजणी (शनिवार) दि.२३ रोजी येथील संतपीठ प्रशासकीय इमारतीमध्ये २६ फेऱ्यात संपन्न होणार आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतमोजणीसाठी १८५ अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नीलम बाफना, सहाय्यक निवडणूक अधिकारी सारंग चव्हाण यांनी दिली आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पैठण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांनी पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सपोनि सिद्धेश्वर गोरे, एमआयडीसी सपोनि ईश्वर जगदाळे, बिडकीन निलेश शेळके, पाचोड शरदचंद्र रोडगे यांची गुरुवारी रोजी संयुक्त बैठक घेऊन निवडणूक निकालाच्या दिवशी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीसह मतमोजणीच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्याचा निर्णय घेऊन बंदोबस्तसाठी विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.
शनिवारी रोजी सकाळी पैठण विधानसभा मतदारसंघाच्या विविध गावांमध्ये झालेल्या मतदानाची मतमोजणी सकाळी उमेदवारसह व प्रतिनिधीच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी एकूण १४ टेबलवर ईव्हीएमची मतमोजणी २६ फेऱ्यात होणार आहे. शेवटची २६ वी फेरी टेबल क्रमांक १ वर करण्यात येणार. यासह पोस्टल मतपत्रिका मोजणीसाठी ८ टेबल असणार आहे. प्रत्येक टेबलवर ५०० मतपत्रिकाची मोजणी केल्या जाणार ETPBMS साठी १ टेबलवर मोजणी होणार. मतमोजणी प्रक्रिया प्रत्येक टेबलवर १ सूक्ष्म निरक्षक १, मतमोजणी पर्यवेक्षक, १ सहाय्यक व शिपाई असे एकूण १८५ अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.