दुसर्याच दिवशी बाजारात ‘लक्ष्मी’चा अवतार; निवडणुका नेहमीच येवो असा मतदारांचा आशावादFile Photo
Published on
:
22 Nov 2024, 6:02 am
Updated on
:
22 Nov 2024, 6:02 am
विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडताच दुसर्याच दिवशी निवडणुकीत उमेदवारांनी वाटलेल्या नोटांना पाय फुटू लागले आहेत. मतदारांना वाटलेल्या पैशांनी बाजारात तेजी आल्याचे चित्र किरकोळ बाजारात दिसू लागले. निवडणुकीच्या दुसर्याच दिवशी किरकोळ व्यापारीवर्ग चांगलाच सुखावला आहे.
काहींनी अनेक ठिकाणी नोटा बाहेर करून पूर्वीचा उधारी व्यवहार मिटविला, तर काहींनी नवीन खरेदीसाठी नोटा बाहेर काढल्याने मोदी सरकारने ‘वन नेशन वन इलेक्शन’ हा राष्ट्रीय कार्यक्रमच पाठीमागे घ्यावा, असे गमतीदार किस्से रंगू लागले आहेत.
जिल्ह्यात विधानसभा निवडणूक चुरशीची झाल्याने प्रत्येक मतदारसंघात पैशांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. या निवडणुकीत मतदारांनी उमेदवारांना निवडून देण्यासाठी लक्ष्मीची माया थेट मतदारांवर उतरवली आहे. एका मताला चार ते सहा नोटा मिळू लागल्याने मतदारांचाही चांगला भाव वाढला असून, मतदारांनीही ‘गंगेत घोड न्हाऊ द्या’ म्हणत लक्ष्मीदर्शनाचा लाभ घेतल्याने एका दिवसातच किरकोळ बाजाराला तेजीचे रूप आल्याचे दिसत होते.
अनेक ग्राहकांनी दुसर्याच दिवशी लक्ष्मीला वाटेला लावून देण्याचा निर्णय घेतल्याने बाजारात चांगली खरेदी झाली असून, कडक नोटांनी अनेकांचा गल्ला भरून निघाला आहे.काहींनी दुसर्या दिवशी बाजारात नोटा काढून उधारी व्यवहार मिटवून टाकला आहे. काहींनी कुटुंबातील हौस फेडण्यासाठी हॉटेल, कपडे, चपला, बूट आदींची खरेदी केली आहे.
मतदारांना मिळणारी रक्कम इतकी भरभक्कम असल्याने काहींनी सवयीप्रमाणे ऑनलाइन होणारा व्यवहार बंद ठेवून कोरी करकरीत नोटांनी व्यवहार भागवला आहे. अनेकांनी गाडीचे खराब झालेले टायर बदलेले, तर काहींनी किराणा माल दुकानातील उधारी भागवली आहे.
आता जिल्हा परिषद, नगर परिषदांकडे लक्ष
निवडणुकीनंतर बाजारातील चित्र व मतदारांची हौस भागल्याने आता जिल्हा परिषद व नगर पालिकांच्या निवडणुकांकडे अनेकांचे डोळे लागून राहिले आहे. नेहमीच अशा निवडणूक येवो, असा आशावाद समाजात चवीने चर्चिला जाऊ लागला आहे.