पुरंदरचा किल्लेदार होणार कोण? धाकधूक वाढलीPudhari file photo
Published on
:
22 Nov 2024, 7:06 am
Updated on
:
22 Nov 2024, 7:06 am
पुरंदर विधानसभा मतदारसंघात एकतर्फी वाटणारी लढत चुरशीची होती. मतदारांचा स्पष्ट कल दिसून आला नाही. आघाडी आणि महायुतीतून रिंगणात असलेले तीन उमेदवार आणि लाडकी बहीण योजना आदी कारणांमुळे यंदाची विधानसभा निवडणूक ही लक्षवेधी ठरली. परंतु मतदानाचा टक्का घटला आणि आमदार संजय जगताप, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे आणि माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांची धाकधूक वाढली. पुरंदरचा किल्लेदार होणार कोण? हे शनिवारी स्पष्ट होईल.
पुरंदर-हवेली मतदारसंघात 16 उमेदवार जरी असले तरी आघाडी व युतीच्या तीन उमेदवारांमध्ये जोराची चुरस आहे. आघाडीकडून काँग्रसचे विद्यमान आ. संजय जगताप पुन्हा नशीब आजमावत आहेत, तर युतीच्या दोन उमेदवारात मैत्रीपूर्ण लढत होत आहे.
शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून माजी मंत्री विजय शिवतारे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून ऐनवेळी अजित पवार गटात उडी मारून घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणारे संभाजी झेंडे निवडणुकीत उतरले आहेत. खरी लढत या तिघांमध्येच होत असल्याने तीनही उमेदवारांकडून विजयाची खात्री व्यक्त होत आहे.
पुरंदर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळला पारगाव, एखतपूर, मुंजवडी, कुंभारवळण, वनपुरी, खानवडी, उदाचीवाडी आदी गावांतील बाधित शेतकर्यांचा मोठा विरोध आहे. त्यामुळे विमानतळबाधित 7 गावांतील मतदान यंदाच्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा निर्णायक भूमिका बजावणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.
पुरंदर विधानसभा मतदारसंघाचा विचार करावयाचा झालाच तर पुणे शहराला लागून असलेली हवेलीतील 18 गावे या मतदारसंघात जोडलेली आहेत. या गावांतून भाजप-सेनेचा मतदारवर्ग मोठा आहे. या 18 गावांवरच पुरंदरच्या विधानसभेचा निकाल सेनेच्या बाजूने गेल्या दोन निवडणुकांतून दिसून आला आहे. सध्या फुरसुंगी-उरुळी देवाची पाणी योजना, पुणे मनपा समाविष्ट 11 गावांचे टॅक्स, फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन्ही गावे महापालिकेतून वगळून, त्यांची स्वतंत्र नगरपरिषद स्थापना केली. परंतु हवेलीत हे मतदार कोणाच्या पाठीशी उभे राहतात हे निकालादिवशी समजणार आहे.
सासवड आणि जेजुरी नगरपरिषद व निरा शहरात काँग्रेसला मोठे मताधिक्य मिळेल, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. तसेच दिवे-गराडे जिल्हा परिषद गटात घड्याळ मताधिक्य घेईल, अशी चर्चा सुरू आहे. तर बेलसर-माळशिरस गटात काँगेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात संमिश्र प्रतिसाद असल्याचे बोलले जात आहे.
तसेच वीर-भिवडी गटात शिवसेना आघाडी घेईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. निरा-शिवतक्रार गटात काँगेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात संमिश्र प्रतिसाद राहील, असे बोलले जात आहे. गुंजवणीच्या पाण्याचे राजकारण्यांकडून आतापर्यंत केवळ राजकारण झाले. पाण्याची कमतरता हीच नेत्यांच्या पथ्यावर पडणारी बाब यावर या वेळीदेखील राजकारण रंगलं.
पुरंदरची जनता कोणत्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. लाडकी बहीण योजना आणि महिलांना निम्म्या सवलतीत बस प्रवास या लोकप्रिय योजनांचा हवाला देत महिला मतदारांना महायुतीतून शिवसेना नेते विजय शिवतारे आणि राष्ट्रवादीचे संभाजी झेंडे यांनी साद घालण्यात आली. या मतदारांचा कोणाला, किती फायदा होईल हे देखील शनिवारी स्पष्ट होईल.
झालेले प्रत्यक्ष मतदान
या निवडणुकीत 4 लाख 64 हजार 17 मतदारांपैकी 2 लाख 83 हजार 164 मतदारांनी मतदानात सहभाग घेतला आहे. यात 1 लाख 33 हजार 787 महिला मतदार, 1 लाख 49 हजार 471 पुरुष आणि इतर 6 जणांनी मतदान केले आहे. पुरंदर-हवेली मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला असून केवळ 61 टक्के मतदान झाले आहे.
नवमतदारांची भूमिका निर्णायक
सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 2 लाख 36 हजार 253 मतदारांनी मतदान केले होते. या वेळी एकूण मतदानाच्या 68 टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत 2 लाख 83 हजार 164 मतदारांनी मतदान केले असले तरी ही मतांचा टक्का खाली आलेला आहे. एकूण 61 टक्केच मतदान झालेले आहे. मात्र, सुमारे 50 हजार मते वाढलेली असल्याने या नवमतदारांनी कोणती भूमिका घेतली यावर या तीनही उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.