मध्य विधानसभा मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत एमआयएमचे विद्यमान आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे.Pudhari News network
Published on
:
24 Nov 2024, 10:01 am
Updated on
:
24 Nov 2024, 10:01 am
मध्य विधानसभा मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत एमआयएमचे विद्यमान आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. राज्यातील सर्वाधिक चुरशीची लढत या मतदारसंघात झाल्याचे बोलले जात आहे. मुफ्ती यांच्या विरोधात तीन उमेदवार असले, तरी ‘इस्लाम’ पक्षाचे उमेदवार आसिफ शेख यांनी चुरशीची लढत दिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले.
राज्यातील सर्वाधिक चुरशीची लढत
18 व्या फेरीनंतर मौलाना व आसिफ शेख यांच्या मतांत चढउतार
रात्री उशिरापर्यंत फेर मतमोजणी
मिळालेली मते
मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल (एमआयएम) - 1,09,653
आसिफ शेख (अपक्ष) - 1,09,491
शान-ए-हिंद (समाजवादी पार्टी) - 9,624
एजाज बेग (काँग्रेस) - 7,527
पहिल्या फेरीपासून ते 18 व्या फेरीपर्यंत आसिफ शेख आघाडीवर होते. सातव्या फेरीअखेर आसिफ शेख यांना मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्या तुलनेत 16 हजार 705 मतांची आघाडी होती. मात्र आठव्या फेरीपासून आसिफ शेख यांचे मताधिक्य कमी झाल्यामुळे निकालाची उत्सुकता वाढली. 13 व्या फेरीच्या अखेरपर्यंत आसिफ शेख यांचे मताधिक्य एक हजार 705 पर्यंत कमी झाल्याने मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल हे निवडणूक रिंगणात परतत असल्याची चिन्हे दिसू लागली. मात्र, 14 व्या फेरीपासून पुन्हा आसिफ शेख यांनी आघाडी घेतली. प्रत्येक फेरीनंतर मतांची आकडेवारी बदलत असल्याने कोण विजयी होणार, याविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
मुस्लीमबहुल असलेल्या मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत मुफ्ती यांच्यासमोर अपक्ष आसिफ शेख, समाजवादीच्या शान- ए- हिंद, काँग्रेसचे एजाज बेग हे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. निवडणूक प्रचारादरम्यान ओवेसी बंधू, अखिलेश यादव हे मालेगावी प्रचारासाठी आले होते. त्यामुळे येथील लढत चौरंगी झाली होती. लोकसभेला काँग्रेसला येथे मोठे मताधिक्य मिळाल्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मतदार पुन्हा पसंती देणार का? याविषयी उत्सुकता लागून होती.
19 व्या फेरीत आसिफ शेख पिछाडीवर गेले, तर मौलाना यांना तब्बल तीन हजार 791 मतांची आघाडी मिळाली. मात्र पुढील फेर्यांमध्ये पुन्हा ही आघाडी कमी होत गेल्याने अखेरच्या फेरीपर्यंत निकाल काय लागतो, याची अनिश्चितता होती. मतमोजणीची 25 वी अखेरची फेरी झाली, तेव्हा केवळ 75 मतांची आघाडी मौलाना मुफ्ती इस्माईल यांना मिळाली.
अपक्ष उमेदवार आसिफ शेख यांचे आगमन 25 वी फेरी जाहीर झाल्यानंतर मतमोजणी केंद्रावर झाले. यावेळी आसिफ शेख यांनी फेर मतमोजणी करण्याची मागणी केली. निवडणूक निर्णय अधिकार्यांनी मागणी मान्य करत पूर्ण फेरमतमोजणी न करता 21 ते 25 फेरींची फेरमतमोजणीचे मान्य केली. रात्री उशिरापर्यंत फेरमतमोजणीचे काम सुरू होते.
मतदारांनी पुन्हा एकदा आपल्या मतदानातून माझ्यावर विश्वास दाखविला आहे. येणार्या काळात विकास कामांना गती देवून भरीव कामे केली जातील.
मौलाना मुफ्ती मो. इस्माईल, आमदार
मान्य आहे. अटीताीच्या लढतीत आमचा पराभव झाला असला, तरी मिळालेली मते आम्हाला प्रेरणा देणारी आहेत.
आसिफ शेख